![]()
एरंडोल प्रतिनिधी
: हॉटेल बॉय कामगार ते प्रोफेसर डॉक्टर असा आयुष्य प्रवास करणारे प्रा.डॉ.आत्माराम चिमकर यांच्या वाट्याला आलेला संघर्ष एखाद्या चित्रपटाच्या वा मालिकेच्या कथानकासारखा व त्यातून तावून सुलाखून बाहेर येणाऱ्या नायकासारखा म्हटल्यास वावगे होणार नाही.
मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा या छोट्याशा खेड्यात एका मजूर कुटुंबात डॉ.चिमकर सरांचा जन्म झाला.हातमजुरी करणाऱ्या मातापित्यांच्या पोटी तीन मुलं व एक मुलगी जन्माला आली.संघर्ष,संकटं यातून मार्गक्रमणा करणाऱ्या मायबापाकडे चिमुकला आत्माराम समज आल्यापासूनच जाणिवेने पाहू लागल्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा विचार अक्षरशः श्वासात जपला. प्राथमिक शिक्षण वढोदा या जन्मगावीच झाले.माध्यमिक शिक्षणाची असलेली ओढ पण आर्थिक खर्च न पेलवणारा या गुंत्याला स्वतः आत्मारामलाच पुढाकार घेणे भाग होते.कारण आई वडील निरक्षर व हतबल.कमालीच्या विनयशील असणाऱ्या आत्मारामने शिक्षकांच्या मदतीने व मार्गदर्शनाने बोदवडच्या हायस्कुलला बोर्डिंगची व्यवस्था असल्यामुळे शिक्षणासोबत राहण्याचा व खाण्या पिण्याचा मोठा प्रश्न सुटला.प्रचंड इच्छाशक्ती असली की मार्ग हा निघतो हे सूत्र त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षणावेळीसुद्धा कृतिरुप केलं.भुसावळच्या नाहटा महाविद्यालयात त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलं. दरम्यानच्या काळात आईवडिलांना मदतीचा हात देता यावा म्हणून या विद्यार्थ्याने शिक्षणासोबतच हॉटेल व्यावसायिकाकडे वेटर आणि कुकची नोकरी केली.पण हार कधी मानली नाही.एम.ए.ची पदवी तर मिळाली.अतिशय मितभाषी असलेल्या आत्मारामचा ना वशिला ना कुणी गॉडफादर ना डोनेशनची व्यवस्था.या यक्ष प्रश्नाची सोडवणूक केली ती एरंडोल येथील डी. डी. एस.पी.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे तत्कालीन अध्यक्ष आदरणीय स्व.दिगंबरदादा पाटील यांनी.मुलगा विदवत आहे.गरिबीतून संघर्ष करीत येथपर्यंत पोहचलाय.याला मदतीचा हात दिलाच पाहिजे ही भूमिका अध्यक्ष दिगंबर दादांनी घेतली. आणि आत्माराम प्रा.ए.टी. चिमकर म्हणून महाविद्यालयात तासिका तत्वावर रुजू झालेत.शिकत असतांना मेहनतीचे बाळकडू आईवडिलांकडून मिळाले होतेच.प्रतिकुलता, विवंचना,संघर्ष,संकटं यातून घडणी झालेल्या आत्मारामांनी तासिका तत्वाच्या नोकरीला मनापासून न्याय दिला.त्यांच्या अध्ययन अध्यापनाची दमदार वाटचाल आदरणीय दादासाहेब दि.शं. पाटील यांच्या हृदयस्थ झाली.अन पूर्णवेळ अध्यापक होण्याची सुवर्ण संधी चिमकर सरांना चालून आली.अथक परिश्रमाची गोड फलश्रुतीचा आनंद आईवडील नातलग आणि मित्र मंडणीना मनापासून झाला. पुढे विवाह प्रपंच आणि नोकरीचा आनंद.पण नियतीने मात्र पुन्हा आपले पाश आवळले. कन्यारत्नाचा जन्म झाला.पण शारीरिक व मानसिक दुर्लबता घेऊन जन्माला आलेली सुकुमार प्रतीक्षा हिने जणू या दाम्पत्याची तब्बल तेवीस वर्षे जणू परीक्षाच घेतली.आणि चिमकर सरांच्या सहा महिण्याआधी प्रतिक्षाने इहलोकाची यात्रा संपवली.दरम्यानच्या काळात चिमकर सरांचे जीवघेणे आजारपण थेट पुण्या मुंबईपर्यन्तची ट्रीटमेंट या थकाथकीने त्यांची पाठ बरेच वर्ष सोडली नाही.पण संकटांशी झुंजतांना संकटांनी हारच खाल्ली हेही तितकेच खरे.आजारपणातच मला पीएच.डी करायची हा त्यांचा निर्धार अधोरेखित करण्यासारखा आहे.औषधं घ्यायची अन संशोधनात स्वतःला झोकून द्यायचं.जिद्द चिकाटी आणि विदवत्ता याबळावर ही पदवीही त्यांनी मिळवली.१९९५ ते २०२६ तब्बल ३१ वर्षाची अध्यापन सेवा देत कृतकृत्य झाल्याचे मोठे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते न दिसते तोच निवृत्तीच्या आठ महिने आधी नियतीने त्यांना हिरावून घेतले.दि.२० नोव्हेम्बर रोजी आजरपणाने परत डोके वर काढले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.एक अभ्यासू व शर्थीने आयुष्यभर संकटांना धूळ चारणारा धीरोदात्त तितकाच विनम्र व हळवा प्राध्यापक मित्र गमावल्याचे शल्य बोचत राहील.त्यांचा सुपुत्र प्रतिक आणि त्यांच्या पत्नी श्रीमती ललिता वहिनी यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी ही विनम्र प्रार्थना.सन्मित्र प्रा.डॉ. आत्माराम चिमकर सरांना असंख्य आठवांची मानवंदना मनःपूर्वक भावश्रध्दांजली
शब्दाकंन
~ प्रा.वा.ना.आंधळे, एरंडोल
७७५८० ५६८७७
![]()
प्रतिक्रिया (0)