मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :
मुंबईवरील २६/११ च्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या मोठ्या मनाचा आणि त्यागाचा एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग अंधेरी येथे पाहायला मिळाला. सावरकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या वीर कुटुंबीयांना देण्यात आलेली आर्थिक मदत त्यांनी स्वतःकडे न ठेवता, ती थेट संत बागेश्वर धाम सरकार यांच्या सामाजिक कार्यासाठी अर्पण करून आपल्या उच्च संस्कार आणि दातृत्वाचे दर्शन घडवले आहे.
अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात 'सावरकर फाउंडेशन'च्या माध्यमातून संत बागेश्वर धाम सरकार (पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी) यांच्या वाणीतून भव्य 'श्री हनुमंत कथे'चे आयोजन करण्यात आले होते. एक नगरसेवक असूनही एखाद्या खासदाराने किंवा संपूर्ण राजकीय पक्षाने राबवावा असा अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि दिमाखदार सोहळा नगरसेवक श्री. रुपेश गजानन सावरकर यांनी यशस्वी करून दाखवला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मुंबईकरांना भक्तीची आणि कीर्तनाची मोठी पर्वणी दिली.
केवळ धार्मिक सोहळ्यापुरते मर्यादित न राहता, याच पवित्र व्यासपीठावरून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील वीर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द करून आर्थिक सहाय्य करण्यात आले. मात्र, या सोहळ्याचा सर्वोच्च भावनिक क्षण तेव्हा आला, जेव्हा या शहीद वीरांच्या कुटुंबीयांनी ही प्राप्त झालेली मदतीची रक्कम बागेश्वर धाम यांच्या लोकोपयोगी आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित केली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या कुटुंबातील हे मोठेपण पाहून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या या संपूर्ण उपक्रमातून हिंदू धार्मिक संकल्पनांचे जतन आणि त्यासोबतच सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्याची प्रगल्भ जाणीव प्रकर्षाने दिसून आली आहे. धर्मकारणासोबतच समाजकारणाचा आणि राष्ट्रभक्तीचा नवा आदर्श या सोहळ्याच्या निमित्ताने उभा राहिला असून, सर्व स्तरांतून नगरसेवक रुपेश सावरकर आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया (0)