![]()
अमळनेर प्रतिनिधी:-जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड होऊन अमळनेर तालुक्यातुन प्रथमच सोसायटी गटातुन महिला संचालक पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल माजी जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांचा पहिला जाहीर नागरी सत्कार अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या वतीने उत्साहात व सन्मानपूर्वक करण्यात आला.
सहकार क्षेत्रातील ही निवड केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून अमळनेर तालुक्याच्या सहकार चळवळीला मिळालेला सन्मान आणि शेतकरी बांधवांच्या अपेक्षांना नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण असल्याने शेतकी संघाने हा सोहळा आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्याप्रसंगी शेतकी संघाचे प्रेसिडेंट संभाजी लोटनराव पाटील, व्हाईस प्रेसिडेंट गणेश धर्मराज भामरे, ज्येष्ठ संचालक विक्रांत भास्करराव पाटील, संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, सुभाष सुकलाल पाटील, सुरेश पिरन पाटील, श्याम साहेबराव पवार, प्रफुल्ल हिरालाल पवार, नितीन बापूराव पाटील, शंकर बंडू बैसाणे, रणजीत भीमसिंग पाटील, जितेंद्र दिनकर पाटील, संचालिका सौ.सुषमाताई वासुदेव देसले तसेच सौ.मालुबाई बापूराव पाटील उपस्थित होत्या.
सत्काराला उत्तर देताना सौ. जयश्रीताई पाटील यांनी शेतकी संघाच्या पदाधिकारी व संचालकांना आश्वासित केले की, अमळनेर तालुका शेतकी संघाच्या माध्यमातून भविष्यात शासनाचे विविध नवनवीन उपक्रम, विकासात्मक प्रकल्प तसेच शेतकरी हिताचे उपक्रम राबविताना आर्थिक सहाय्य अथवा अन्य मदतीची आवश्यकता भासल्यास निश्चितच सकारात्मक विचार करण्यात येईल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा आणि इतर आवश्यक बाबींसाठी शेतकी संघाच्या मागण्यांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. तिलोत्तमाताई पाटील यांनी अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून प्रथमच एका महिलेची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौ. जयश्रीताई पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाढीव कर्जपुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शेतकी संघाचे मा.व्हॉईस प्रेसिडेंट दीपक बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ.मंदाकिनी पाटील, शहराध्यक्षा श्रीमती आशाताई चावरिया,रुग्णकल्याण समितीच्या सदस्या सौ अलका पवार, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र झाबक, माजी नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक राजू फाफोरेकर, नगरसेवक रामकृष्ण पाटील, कैलास पाटील (मुख्याध्यापक लोण), गुणवंत पाटील (झाडी), निळकंठ पाटील, राहुल गोत्राळ यांच्यासह शेतकी संघाचे सभासद व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ संचालक संजय पुनाजी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मॅनेजर संजय पाटील व शेतकी संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान सौ. जयश्रीताई पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे अमळनेर तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या असून त्यांच्या माध्यमातून शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि शेतकी संघाला नवी बळकटी मिळेल, तसेच सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास सर्वांकडून व्यक्त करण्यात आला.
प्रतिक्रिया (0)