![]()
धरणगाव प्रतिनिधी : (पी डी पाटील)
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील सागर कॉलनीमध्ये बेलदार समाजाने सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल उचलले. राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांनी प्रेरित होऊन, निसर्गवासी ग.भा.सुकमाबाई फुलसिंग चव्हाण यांच्या दशक्रिया व गंधमुक्तीचा कार्यक्रम सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रथमच सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. बेलदार समाजात अशा प्रकारचा सत्यशोधक विधी प्रथमच पार पडल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.सुनील, दिलीप, किशोर, विलास, तुषार व निवास फुलसिंग चव्हाण या बंधूंनी पारंपरिक अंधश्रद्धा, अनावश्यक कर्मकांड व आर्थिक शोषणाला फाटा देत आपल्या मातोश्रींचा दशक्रिया व गंधमुक्ती विधी सत्यशोधक पद्धतीने करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सत्यशोधक समाज संघाचे विधी संचालक सत्यशोधक शिवदास महाजन यांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला. चव्हाण परिवाराने घेतलेला हा निर्णय समाजपरिवर्तनाच्या चळवळीला बळ देणारा ठरला.
![]()
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी.पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत सत्यशोधक समाजाच्या विचारधारेचे सविस्तर विवेचन केले. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात बेलदार समाजाने उचललेले हे परिवर्तनवादी पाऊल निश्चितच बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे. समाजाने अंधश्रद्धा, रूढी-परंपरांच्या नावाखाली होणारे शोषण आणि अनावश्यक कर्मकांड यांपासून दूर राहून विवेकवादी व मानवतावादी विचारांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.संत-महापुरुषांच्या विचारांचे दाखले देत पी. डी. पाटील यांनी अत्यंत साध्या, खर्चिक बाबींना फाटा देणाऱ्या आणि विचारांना प्राधान्य देणाऱ्या सत्यशोधक विधीचे महत्त्व विशद केले. “बहुजन समाजाने बेलदार समाजाचा आदर्श घ्यावा,” असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात उपस्थितांना महात्मा फुले यांचे अमर जीवन आणि पी. डी. पाटील लिखित ‘आदर्श महामाता’ हे ग्रंथ भेटस्वरूपात देण्यात आले. तसेच सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी चव्हाण परिवाराने सत्यशोधक समाज संघटनेला एक हजार रुपयांचा सहयोग निधी सुपूर्द केला.याप्रसंगी देविदास चव्हाण, बाळू चव्हाण, रामदास चव्हाण, भीमदास चव्हाण, गुलाब चव्हाण, अशोक चव्हाण, फुलसिंग चव्हाण, संजय माळी, मानव मुक्ती मिशनचे तालुकाध्यक्ष रतिलाल माळी, कांतीलाल महाजन व प्रवीण पाटील यांच्यासह चव्हाण परिवारातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.अशा प्रकारे चव्हाण परिवाराने दुःखाच्या प्रसंगातही विवेक, विचार आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका स्वीकारत बेलदार समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. पाळधी येथून पेटलेली सत्यशोधक विचारांची ही मशाल इतर समाजांपर्यंत पोहोचावी, हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती ठरावी.
![]()
प्रतिक्रिया (0)