![]()
![]()
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील कत्तलखान्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नगरपालिकेने कत्तलखाना जमीनदोस्त केला आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षक हिंदू संघटनेने या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडत उपोषण सुरू केले होते. अखेर त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आणि नगरपालिकेने विशेष सभेत ठराव मंजूर केल्याने कत्तलखाना हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर हिंदू संघटनांनी आपले उपोषण मागे घेतले.
या प्रश्नावर नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माजी आमदार शिरीष चौधरी, जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिताताई वाघ आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी विशेष प्रयत्न केले. खासदार स्मिताताई वाघ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. उपोषण सोडविण्याच्या वेळीही त्या प्रत्यक्ष उपस्थित होत्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
विकास आराखड्यात कत्तलखान्याचे आरक्षण नसल्याचे स्पष्ट
नगरपालिकेने उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केली असता, २५ एप्रिल २०२५ रोजी मंजूर झालेल्या विकास आराखड्यानुसार संबंधित जागेवर कत्तलखान्याचा वापर अथवा त्यासाठीचे आरक्षण दिसून येत नसल्याचे स्पष्ट झाले. सध्या लागू असलेल्या विकास योजनेनुसार या जागेवर दफनभूमी आणि क्रमांक ६२ पार्कचे आरक्षण दर्शविण्यात आले आहे.
कत्तलखान्याची तांत्रिक स्थिती तपासण्यासाठी नगरपालिकेने बाम्भोरी इंजिनिअरिंग कॉलेजला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार १९ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित कत्तलखाना निष्कासित करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले. तसेच पालिकेचे सल्लागार वकील ॲड. किरण पाटील यांनीही कायदेशीर बाबी तपासून कत्तलखाना निष्कासित करण्याचा सल्ला दिला.
![]()
विशेष सभेत ठराव क्रमांक २०२ मंजूर
या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर २८ नोव्हेंबर रोजी नगरपालिकेची तातडीची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नागरिकांच्या भावनांचा सन्मान राखून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, गटनेते पंकज चौधरी, अपक्ष गटनेते महेश देशमुख यांच्यासह नगरसेवकांनी चर्चा करून ठराव क्रमांक २०२ मंजूर केला.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम २६६ (२) अन्वये कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना कारवाईचे आदेश दिले.
या ठरावाच्या वेळी साहेबराव पवार, अनिल महाजन, दीपक चौघुले, सविता संदानशिव, अपूर्वा चौधरी, कैलास पाटील, सुवर्णा हटकर, श्रीराम चौधरी, सुयोग धनगर, रामकृष्ण पाटील, छाया बाळू पाटील, नीलिमा पाटील, कल्पना परदेशी, स्वाती परदेशी, सचिन कासार, प्रवीण पाटील, सचिन पाटील, स्वप्ना पाटील, भरत ललवाणी आणि विजय पाटील यांच्यासह नगरसेवक सहभागी होते.
६५ पोलिसांच्या बंदोबस्तात कत्तलखाना जमीनदोस्त
दरम्यान, उपायुक्त जनार्दन पवार यांनीही अमळनेर येथे भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, एपीआय साजिद मन्सुरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर यांच्यासह सात पोलीस अधिकारी आणि सुमारे ६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्तात कत्तलखाना जमीनदोस्त करण्यात आला.
अखेर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्णविराम मिळाला असून, कत्तलखाना हटविण्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर संबंधित हिंदू संघटनांनी उपोषण मागे घेतले. या घडामोडीमुळे अमळनेर शहरातील हा संवेदनशील विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
चौकट
खासदार स्मिता वाघ ठाण मांडून
खासदार स्मिता वाघ या प्रश्नःसाठी अमळनेर येथे ठाण मांडले असताना काल दुपारपासून नगरपरिषदेत उपस्थित राहून जिल्हा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधला. कत्तलखाना कायमस्वरूपी निष्कासित करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. नगरपरिषद उपायुक्त जनार्दन पवार यांनीही खासदारांच्या पाठपुराव्यानंतर अमळनेर येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. विशेष सभेतील ठराव आणि प्रशासनाकडून कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निष्कासनाची तयारी करण्यात आली.
सायंकाळी पाचच्या सुमारास नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात कत्तलखाना जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली. यावेळी डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीआय गणेश अहिरे, एपीआय साजिद मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड आणि नामदेव बोरकर यांच्यासह सात पोलीस अधिकारी आणि ६५ पोलीस कर्मचारी तैनात होते. कारवाई पूर्ण झाल्यानंतरआंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा मुख्य मागणीच्या पूर्ततेने शेवट झाला.
कत्तलखाना जमीनदोस्त करण्याच्या मागणीसाठी विजय धनराज पाटील, विश्वनाथ मिस्त्री आणि गोपाल वाघ यांनी नगरपरिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. विशेष सभेत ठराव मंजूर होऊन प्रत्यक्ष कारवाई झाल्यानंतर खासदार स्मिता वाघ, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, नगरसेवक अनिल महाजन, साहेबराव पवार, महेश देशमुख आणि भैरवी पलांडे यांच्या हस्ते तिन्ही उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यामुळे कत्तलखान्याच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या आंदोलनाची अखेर झाली असून, शहरातील नागरिकांचे लक्ष आता संबंधित जागेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार पुढील नियोजनाकडे लागले आहे.
प्रतिक्रिया (0)