![]()
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेवर आधारित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपशिक्षक पी.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, अधिकार आणि कर्तव्यांची माहिती देऊन संविधानाचे महत्त्व विशद केले. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही संविधानाने दिलेली उदात्त मूल्ये प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनात जोपासली पाहिजेत, असे आवाहन पाटील यांनी केले.भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन एस एन कोळी व सर्व शिक्षक बंधू-भगिनी व विद्यार्थ्यांनी सामूहिक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की, भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संविधानाचे नियमित वाचन करून त्यातील मूल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शालेय नोटबुक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी केले, तर एस.एन.कोळी यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप नागरिक तसेच देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. अशा प्रकारे संविधानिक मूल्यांची जपणूक आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*हस्ताक्षर स्पर्धेतील वर्गनिहाय प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी :*
१. इयत्ता ५ वी – प्रशांत बाळू पाटील
२. इयत्ता ६ वी – भावेश अशोक कोळी
३. इयत्ता ७ वी – कु. मंगला वेचाण बारेला
४. इयत्ता ८ वी – प्रेम रविंद्र पाटील
५. इयत्ता ९ वी – कु. भावना उरमल बारेला
६. इयत्ता १० वी – कु. मयुरी राजेंद्र भोई
प्रतिक्रिया (0)