अमळनेर प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून अमळनेर येथे तीन दिवसीय ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रबोधन व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. युवा कल्याण प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांच्या वतीने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक, विचारवंत आणि सामाजिक अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत.
१८२७-२०२७ : २०० वर्षांचा विचारांचा वारसा, समतेच्या भविष्यसाठी’ ही संकल्पना या व्याख्यानमालेच्या केंद्रस्थानी असून संत परंपरा, सत्यशोधक विचार, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय या विषयांवर वैचारिक मंथन घडवून आणण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
पहिला दिवस : ३० नोव्हेंबर
**पत्रकार अशोक वानखेडे यांचे ‘संविधान, लोकशाही आणि जनतेचा आवाज’ या विषयावर व्याख्यान**
सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे यांचे ‘संविधान, लोकशाही आणि जनतेचा आवाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. लोकशाही व्यवस्थेतील माध्यमांची भूमिका, संविधानाचे महत्त्व, जनतेचे प्रश्न आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन या अनुषंगाने ते आपले विचार मांडतील.
या दिवशी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. रणजित शिंदे (मुख्याध्यापक), माजी व्हाईस चेअरमन तथा संचालक, अर्बन बँक, अमळनेर आणि श्री. किरण माळी, संचालक, आयकेडी मॅथ्स अकॅडमी, अमळनेर उपस्थित राहणार आहेत.
दुसरा दिवस : १ डिसेंबर
**डॉ. दीपक पवार यांचे ‘समकालीन महाराष्ट्रातला विद्रोह’ या विषयावर व्याख्यान**
मंगळवार, १ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठातील सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांचे ‘समकालीन महाराष्ट्रातला विद्रोह’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय घडामोडी, विद्रोही विचारांची परंपरा, सामाजिक परिवर्तनाची चळवळ आणि समकालीन समाजातील संघर्ष यावर ते आपले विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, प्राचार्य, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा आणि प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तिसरा दिवस : २ डिसेंबर
**प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांचे ‘सत्यशोधक स्त्रीवाद, जातवास्तव आणि सामाजिक न्याय’ या विषयावर व्याख्यान**
बुधवार, २ डिसेंबर रोजी प्राध्यापिका प्रतिमा परदेशी या ‘सत्यशोधक स्त्रीवाद, जातवास्तव आणि सामाजिक न्याय’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा स्त्री-पुरुष समानतेशी असलेला संबंध, जातवास्तवाचे सामाजिक परिणाम, स्त्रियांचे प्रश्न आणि सामाजिक न्यायाची संकल्पना यावर या व्याख्यानातून प्रकाश टाकला जाणार आहे.
या दिवशी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती निवेदिता कापडणेकर, मुख्याध्यापिका, शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, अमळनेर आणि प्रा. योगिता पाटील, नगरसेविका, अमळनेर नगरपरिषद उपस्थित राहणार आहेत.
विचारांच्या परिवर्तनाची संधी
महात्मा ज्योतिराव फुले यांनी समता, शिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठी दिलेला विचारांचा वारसा आजही समाजाला दिशा देणारा आहे. त्याच विचारांचा जागर करण्यासाठी आयोजित या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना समकालीन प्रश्नांकडे चिकित्सक आणि परिवर्तनवादी दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळणार आहे.
**व्याख्यानमालेचे ठिकाण :** छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर.
**वेळ :** दररोज सायंकाळी ६.३० वाजता.
‘बुडता हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणोनिया।।’ या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील लोककल्याणाची भावना जपत आयोजित करण्यात आलेल्या या प्रबोधनपर व्याख्यानमालेस विचारप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक युवा कल्याण प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
**अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२२२७८२५६**
प्रतिक्रिया (0)