*नांदी ची नांदी..!*
दिवाळी संपली आणि नांदी संमेलनाची नांदी लागली.. त्यानिमित्ताने शहरात विविध प्रतिष्ठित, साहित्यिक, लोकप्रतिनिधी, प्रेरणादायी लोकांच्या भेटीगाठी झाल्या.. काहींना त्या भेटीबद्दल अत्यंत आनंद झाला, तर काहींनी कामापुरता वेळ दिला.. ज्यांना भेटायला गेलो आणि ज्यांच्या सोबत भेटायला गेलो ती सारीच मंडळी प्रेरणादायी.. भेटलेल्या लोकांचे विचार ऐकले त्यासोबतच ज्यांच्यासोबत भेटायला जात होतो त्यांचेही अनमोल विचार ऐकले.. अमळनेरच्या काही अप्रकाशित गोष्टी त्यांच्याकडून ऐकता आल्या.. पूर्वीच्या अमळनेरातील काही झाकोळलेल्या व्यक्तींबद्दलही काही माहिती मिळाली..काही गमतीदार किस्से देखील ऐकले.. काही गोड तर काही कटू अनुभव पण आले.. पण या सर्वात समृद्ध करणारे अनुभवच जास्त.. सेवानिवृत्त पोलीस दलातील अधिकारी हिरामण कंखरे, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, त्यांच्या कन्या भैरवीताई पलांडे आणि अनेक चांगले अनुभव..
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अमळनेरचे सर्व सदस्य आम्ही या नांदी संमेलनासाठी गावभर हिंदळलो.. वेगवेगळ्या क्षेत्रातील ही लोकं अमळनेरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्कृती टिकवण्यासाठी रानोमाळ करतात. हे यातून जाणवलं.. काही अत्यंत साधी, काही नेभळट बोलणारी, तर काही आतल्या आत साठवणारी माणसं..गोकुळ बागुल बीएसएनएल या टेलिफोन क्षेत्रातील सेवानिवृत व्यक्ती. अत्यंत साधी राहणी, पण बऱ्याच मराठी, अहिराणी पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे.. त्याचबरोबर त्यांची प्रकाशन संस्था देखील आहे.. पण अत्यंत साधेपणा.. त्यांनी देखील बऱ्याच माणसांचा उल्लेख केला..जे साहित्य क्षेत्रात नावाजलेले होते.. भाऊसाहेब देशमुख अमळनेर नगर परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी.. ललित लेखक, स्तंभलेखक, वैचारिक लेखनाचे धनी असलेले हे.. पण संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अत्यंत निष्ठेने काम करणारी व्यक्ती.. त्यांनीही त्यांच्या सेवा काळातील विविध अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे किस्से सांगून व्यक्ती आणि त्याचे जीवन याबद्दल प्रकाशझोत टाकला.. दिलीप सोनवणे सेंट्रल बँकेचे निवृत्त कॅशियर अधिकारी. अत्यंत दिलखुलास.. त्यांच्या घरी आम्ही सर्व जेव्हा गेलो, तर त्यांच्या घरातील आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळ्या जातीतील इतकी झाडं आहेत की, त्यावरून त्यांचं निसर्ग प्रेम कळावं.. छोट्या - मोठ्या बऱ्याच कुंड्या आणि त्या कुंड्यांमध्ये विविध वनस्पतीजन्य, शोभेची अनेक झाडं त्यांनी लावलेली आहेत.. बरं, ती झाडं नुसतीच लावली नाहीत. तर त्या झाडांबद्दलची सर्वी इत्यंभूत माहिती त्यांना आहे.. त्यावरून त्यांनी त्या झाडांना किती जीव लावला आहे हे समजतं. त्यांच्या घरी या सर्व मंडळींनी वेगवेगळ्या साहित्यातील लोकांच्या तसेच राजकारणाच्या, संस्कृतीच्या, येणाऱ्या काळात शहरातील साहित्य संस्कृती आणि इतर व्यापक संस्कृती कशी टिकवावी याबद्दल चिंता ही व्यक्त झाली.. आणि आपल्या नंतर हे कोण करेल याबाबतही विचार विनिमय झाला..
आमचे अध्यक्ष संदीप घोरपडे. साहित्य, संस्कृती, वारकरी संप्रदाय, शिक्षण, राजकारण इत्यादी अनेक क्षेत्राबद्दल ते लीलया बोलतात.. नाट्यप्रेमी माणूस.. त्यासाठी विविध पातळ्यांवर धडपड सातत्याने करणारा आत्ममगन व्यक्ती.. त्यांच्या घरी ही अनेक गोष्टींची चर्चा झाली.. घरातील पुस्तके..या वरील गोष्टींबाबत साक्ष देतात.. साहित्य चळवळ आणि त्याबाबतीत काहीतरी करण्याची नेहमीच उर्मी असलेली व्यक्ती.. त्यांच्याकडूनही भरपूर गोष्टींची माहिती झाली.. आणि अनेक साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि अमळनेरात देशातील, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील आलेल्या व्यक्तींबाबत ही बऱ्याच गोष्टी समजल्या..
दिनेश दादा नाईक. एक वेगळंच रसायन.. अत्यंत विनम्र, विनयशील व्यक्ती.. अगदी वाडी संस्थान तर पार साने गुरुजींच्या आठवणी.. विविध व्यक्तींची तपशीलवार माहिती, त्या व्यक्तींनी केलेल्या कार्याबद्दल च्या सगळ्या गोष्टी यांना अगदी बरकाव्या सह माहिती.. कामाबद्दल तक्रार नाही, पदाबद्दल गर्व नाही.. नेहमीच घेतलेलं काम निष्ठेने करणारा व्यक्ती..आणि हो अगदी साधा शर्ट-पँट, पायात चप्पल, हातात कागद आलेली प्लास्टिक ची पिशवी.. त्यांच्याबद्दल भावलेली एक गोष्ट, कोणत्याही विचारांच्या व्यक्तीला स्वीकारणं..
नरेंद्र आण्णा निकुंभ. आयुष्याच्या उत्तरार्धातही साहित्यिक व सांस्कृतिक वारसा टिकविण्यासाठी धडपडणारा माणूस.. परखड बोलणे, कामाबाबत प्रेरित करणे ही त्यांच्याकडून विकण्यायोग्य गोष्ट.. प्रा.डॉ रमेश माने. मराठीतील लेखक, पुस्तकं, त्या लेखकांचे विचार, त्या पुस्तकांच्या ओळी प्रसंगानुरूप अलगत त्यांच्या मुखात येतात..आणि सहजच तसे ते दाखले देतात.. वाचनाचा दांडगा व्यासंग, मराठी भाषेतील शुद्धलेखनाचा गाढे अभ्यासक, मराठी साहित्याचं समीक्षण करणारे, अनेक प्रासंगिक लेख, त्याचबरोबर विविध वर्तमानपत्रात वैचारिक लेख लिहिणारे लेखक. आणि सर्वांना मदतीसाठी सदैव तत्पर असलेली व्यक्ती.. प्रताप कॉलेजच्या मराठी विभागात या सर्व मंडळींबरोबर त्यांच्यासोबत ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली.. त्यांच्या साहित्य प्रेमाची आणि मार्गदर्शनाची नेहमीच सोबत मला मिळत राहते.. मित्रवर्य मनोहर नेरकर केंद्रप्रमुख, परंतु रसग्रहण करणारे गुणग्राही मित्र. साहित्यावर विशेष प्रेम, वाचनाचा व्यासंग आणि सुंदर हस्ताक्षराचे धनी.. त्यांच्याकडूनही भरपूर शिकता येतं..आम्ही नेहमीची सोबत.. सौ. सुनीता पाटील व रत्नाकर पाटील नेहमी साहित्यावर प्रेम करणारे दांपत्य.. एकमेकांना साथ देणारे..
उमेश काटे, निरंजन पेंढारे आम्ही काहीतरी नेहमी शिकत राहणारे.. कार्यक्रमाचे नियोजन व इतर गोष्टीसाठी सतत प्रयत्न करणारे..प्रा. डॉ ज्ञानेश्वर मराठे प्रताप कॉलेजच्या कॉमर्स विभागाचे एच ओ डी. फार बोलत नाहीत, पण सगळ्यांचा ऐकून घेणे हा त्यांचा एक साधा गुण.. या दरम्यान तेही चांगले मित्र झाले. त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी शिकता आल्या..प्रा बी एन चौधरी नाना यांच्यासोबतही बऱ्याच बैठका झाल्या. बरेच अनुभव शेअर झाले. एक उत्कृष्ट लेखक, मनमिळाऊ व्यक्ती आणि सर्वांच्या आनंदात सहभागी असणारे व्यक्ती.फार सुंदर लिहतात..प्रेरणा देतात..एकूणच सारे अनुभव संपन्न व्यक्ती.
इतक्या प्रयत्नांनी नांदी साहित्य संमेलन नक्कीच यशस्वी होईल..पण ते यशस्वी करण्यामागचे प्रयत्न आणि व्यक्ती हे मात्र चिरस्मरणात राहतील..म्हणून "प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद कितीतरी श्रेष्ठ असतो." हे मात्र या सर्व उपद्व्यापातून जाणवले.एकूणच या दिवाळीनंतर चा हा समृद्ध करणारा अनुभव मनाला वेगळी उंची आणि खाद्य पुरवणारा..!
शब्दसंपदा
*-शरद भिका पाटील*
प्रतिक्रिया (0)