-----ग्रामीण व्यथा समर्थ पणे मांडणारा लेखक------
----"अशोक कौतीक कोळी" ---
••••••••••••••••••••••••••••••••••••••
-दिलीप देशपांडे.
( जामनेर. .जि.जळगाव.)
हल्ली-पुणे.
मो.नं.८९९९५६६९१७
dilipdeshpande24@gmail.com
***********************************
ग्रामीण भागातील परिस्थिती, सर्वसामान्य शेतकऱ्यांच दुःख, वेदना,व्यथा,त्यांच्या समस्या, आपल्या कथा,कविता, आणि कादंबरीतून आपल्या बोली भाषेतून,तावडी बोलीतून समर्थपणे मांडणारे नाव म्हणजे अशोक कौतिक कोळी .
जामनेर तालुक्यातील ,सुनसगाव ह्या लहानश्या खेड्यात शेतमजूर कुटुंबात जन्मलेले अशोक कोळी यांच बालपणही ह्याच ग्रामीण भागात गेल.वडिलांनी मोलमजुरी केली.अनेक हालअपेष्टा सहन केल्यात.आपल्या वाट्याला आलेल हे जगणं आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी शिक्षणाचा मार्ग मुलाला दाखवला.आणि त्याचाच परिणाम म्हणून अशोक कोळी यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केलं. एम.ए.एम फिल,पी एच.डी.पर्यत शिक्षण पूर्ण करुन डाँक्टरेट मिळवली. वडिलांची ईच्छा पूर्ण केली.
घरात गरिबी होती,कुठलाही शैक्षणिक वारसा नव्हता,साहित्यिक वारसा नव्हता,अशा परिस्थितीत आजूबाजूच्या परिस्थितीनेच त्यांना लिहित केलं,असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
गावात असलेल्या छोट्याश्या ग्रंथालयातून वाचनाची गोडी लागली. त्यानंतरचे काळात अनेक पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली. धग,गोतावळा,गांधारी बनगरवाडी,पाचोळा,,तहान,बारोमास,अशा निरनिराळ्या कथा,कादंबऱ्या, कवितांसंग्रहाच वाचन झालं.साहित्यिक कार्यक्रमास उपस्थिती झाली.मोठ्या साहित्यिकांशी गाठीभेटी झाल्यात.त्याच्याशी संवाद झाला.गो.तु.पाटील, रंगनाथ पाठारे,वासुदेव मुलाटे,रा.रं.बोराडे,यांची भाषणं ऐकण्याचा योग आला. मार्गदर्शन मिळाले.महात्मा जोतिबा फुले यांच्या "शेतक-याचा आसूड" ने त्यांना विशेष प्रभावित केलं. ना.धों.महानोरांचा सहवास लाभला.त्या बद्दल
अशोक कोळी म्हणतात-"महानोरांची पहिली भेट प्रत्येक क्षण आणि शब्द मी मनाच्या वहित मोरपीसा प्रमाणे जपून ठेवलाय.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि साहित्याने माझ्या मनावर पुरते गारूड केले."
"त्यांचा साधेपणा, मार्गदर्शन करण्यातली आत्मियता त्यांच्या "हिरव्या बोलीने माझ्या पंखात बळ आले."
एकूणच साहित्याची गोडी वाढत असताना वाचना कडून लिखाणा कडे कसा वळलो माझं मलाच कळले नाही.असेही ते नमूद करतात.
कथा लेखनाने अशोक कोळींच्यां लेखनाची सुरूवात झाली."कुड"ही कथा २००१ साली लोकमत दिवाळी अंकात बाराशे कथातून पहिली आली. "या कथेच्या लेखकाविषयी भविष्यात विशेष अपेक्षा बाळगाव्यात असे आवर्जून वाटते, लेखकाने या कथेतून जे अत्यंत कलात्मकतेने सादरीकरण केलेले आहे,ते वाचून थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांची आठवण यावी, हेच ह्या लेखकासाठी अधिकचे पारितोषिक मानायला हरकत नाही" हा तरुण उद्याचा समर्थ कथा लेखक ठरल्यास आश्चर्य वाटायचे नाही.असा अभिप्राय परीक्षक वा.रा.सोनार यांनी दिला होता.
आजूबाजूचा ग्रामीण भाग.शेतकरीबांधवाच रोजच जगणं.शेती पिकवतांनाची त्याची होणारी कसरत.निसर्गाच अनियमित चक्र,येणारा माल आणि बाजार पेठेत भावासाठी व्यापारीवर्गा कडून होणारी अडवणूक. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सगळेच प्रश्न त्यांच्या कथा,कादंबऱ्या, आणि कवितेचे विषय झाले आहेत.
कुड,आसूड,सूड,उलंगवाडी,चार कथासंग्रह.पाडा,कुंधा,दफ्तर, रक्तळलेल्या तुरी,गावाच्या तावडीतून सुटका,ह्या कादंबऱ्या,
गावा कडल्या कविता हा कवितासंग्रह,आशान आस व्हतं,हा लेख संग्रह.दोन बाल कविता संग्रह,दोन कुमार कादंब-या,ज्यात तावडीबोलीचा वापर त्यांनी आपल्या लिखाणासाठी केला तिचा सविस्तर पणे परिचय करुन देणारे तावडी बोली,ग्रामीण कथा-नवे आकलन समिक्षा ग्रंथ, ही पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत.
शेती,शेती संबधित प्रश्न,शेतक-याच होणार शोषण,बाजारपेठेत शेतमाल विकतांना होणारी त्याची दमछाक,होणारी अडवणूक शेतक-याचे कॊटुबिक समस्या विषयीचे ग्रामीण वास्वव आपल्या कुंधा,पाडा,रक्तळलेल्या तुरी,गावाच्या तावडीतून सुटका ह्या कादंबऱ्या मधून अशोक कोळींनी मांडले आहे.
"पाडा"ही अशोक कोळींची पहिलीच कादंबरी. झाडावर केळीची पूर्ण वाढ झाली की, ते केळीचे घड झाडावरुन उतरवून बाजारात. विक्रिला नेण्याची प्रक्रिया म्हणजे पाडा.चांगदेव तापकीर या तापीकाठच्या शेतक-याचे कुटुंबाच्या वाताहतीची कहाणी "पाडा"ह्या कादंबरीत सांगितली आहे.
"सदानंद देशमुखांचे "तहान" "बारोमास"या कादंबऱ्यांनंतर खेड्यातील शेतक-याची परवड इतक्या प्रभावीपणे मी तरी पहिल्यांदाच अनुभवली. कोळी हे महाराष्ट्रातील महत्वाचे कादंबरीकार आहेत.येणाऱ्या काळात जी नवी कादंबरी लिहिली जाणार आहे,त्यात त्यांच नाव ओलांडून जाता येणार नाही." त्याच्या लेखणीत तितक आश्वासन नक्किच आहे.त्या दृष्टिने त्यानी सातत्यानी प्रयत्न करावे अशी अपेक्षा जेष्ठ लेखक रंगनाथ पठारे व्यक्त करतात.
"कुंधा" म्हणजे शेतीचा पिकाचा नाश करणारे गवत, तण.ते पिकाचा नाश तर करतेच पण त्याच बरोबर शेतकऱ्यालाही बरबाद करते. ते नष्ट करायचे म्हणजे त्याला खोदून काढून, जाळूनच नष्ट करावे लागते.कुंधा हे एक प्रतिक आहे. कुंधा शेतातला आणि कुंधा शेतक-याच्या आयुष्यातला.वतनदार आणि आसामी ह्या दोघातला संघर्ष आहे.एका बाजूला कष्टकरी शेतकरी आहे.तर दुस-या बाजूला सावकार, बँका,पतपेढ्या,धनदांडगे, राजकीय नेते यातला हा संघर्ष आहे.
शेतकऱ्याचे दुःख आणि त्याची कारणमीमांसा आपल्या "कुंधा"ह्या कादंबरितून दाखविण्यात कोळी यशस्वी झाले आहेत असे म्हणावे लागेल.
शेतकऱ्याची पिळवणूक होऊ नये,म्हणून शासना कडून शेतमालाचा "हमीभाव" ठरवला जात असतो.पण तोही वेळेवर ठरेल याची हमी नसते आणी ठरला तरी त्या भावाने व्यापारी तो खरेदी करतील याचीही हमी नसते.कपाशी च्या पिकाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी पिक बदलवून तुरीच पिक घेतो. अशाच एका शेतकऱ्याची ही कहाणी "रक्ताळलेल्या तुरी"ह्या आपल्या कादंबरीतून अशोक कोळींनी मांडली आहे. त्याला तुरीच पिक तर चांगल येत.चांगला हमीभाव मिळणार असतो.त्यामुळे घरात उत्साहाच वातावरण संचारतो.अनेक गोष्टी करता येतील अशी स्वप्न बघितली जातात.पण सगळं फोल ठरत.खरेदी केंद्र केव्हा सुरु होत आणी बंदही होत.कशाचा ठावठिकाणा नसतो.घरात माल पडून असतो.कर्जाची ओझं,सावकाराच देणं,भंगलेल्या आशा,आणि आलेल नैराश्य,व्यसनाधीनतेला कारणीभूत ठरतं.शासनाच्या बेभरवशी धोरण शेतकऱ्याचे नाशाला कसे कारणीभूत ठरते,ह्याच खरखुर चित्रण ह्या कादंबरीत वाचायला मिळत.
शाळकरी मुलांना "दप्तर" हा एक खजिनाच असतो.वह्या-पुस्तकां बरोबरच त्यांच मन आणि भावनांची त्यात गुंतवणूक असते. ग्रामीण भागातील शाळकरी मुलांच्या वाट्याला येणारं दुःख, विवंचना,खूप असते. शिकण्याचीओढ असूनही घरातील दारिद्रय, व्यसनाधीनता, ह्या बरोबर मुलाना संघर्ष करावा लागतो.अशाच एका "मिल्या " नावाच्या मुलाचे भावविश्व "दप्तर" ह्या कादंबरीत साकारले आहे.अशोक कोळींनी स्वतः शालेय वयात अनेक गोष्टी अनुभवलेल्या आहेत.परिस्थतीचे चटके बसले आहेत.स्वानुभवातून लिखाण असल्याने ते मनाला चटका लावून जाते.कोळी म्हणतात "दप्तर मधील मिल्या प्रमाणे मी ही बकऱ्या चारल्या आहेत,विटभट्टीवर काम केल आहे.आईवडील मजुरी करायचे,त्यामुळे चांगल्या दप्तरा साठी, शालेय वस्तूं साठी मलाही प्रतिक्षा करावी लागली आहे.संघर्ष करावा लागला आहे.गरिबी मुळे, स्थलांतरा मुळे अनेकदा मुलांना शाळेपासून दूर राहाण्याची समस्या कशी निर्माण होते हे ही दाखवण्याचा प्रयत्न ह्या कादंबरीतून केला आहे.
अशोक कोळींचा लेखनप्रवास कथा लेखना पासून सुरु झाला. कुड,आसूड,सुड,उलंगवाडी,हे त्याचे कथा संग्रह. व अशानं आस व्हत हा लेख संग्रह .खेड्यातील वास्तवाच चित्र त्यांच्या कथा मधून डोळ्यासमोर उभे रहाते. कापूस उत्पादक शेतकरी,केळी उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्न समस्यां ते मांडतात. ग्रामीण जीवनातील सुःख-दुःख, हालअपेष्टा, प्रामुख्याने त्यांचे कथांचे विषय आहेत.शेतीच्या मशागती पासून उत्पादित मालाचा चुकारा मिळे पर्यंत च्या प्रक्रियेत (सिस्टीम) शेतकरी कसा नाडला जातो.त्याला येणार नॆराष्य,आत्महत्येचे विचार याच यथार्थ निरीक्षण लिखाणातून प्रत्ययास येते.त्यामुळे त्यांच्या कथेत जिवंतपणा आला आहे.त्यांच्या कादंबरी, कथासंग्रह,कथा यांचे शिर्षकही अर्थपूर्ण असल्याचे दिसते.
त्यांच्या कथां बद्दल प्रसिद्ध समीक्षक डाँ वासुदेव मुलाटे म्हणतात "अशोक कोळी हे केवळ कल्पनेच्या भरा-या मारणारे कथा लेखक नाहीत. त्यांनी जे बघितले, अनुभवले तेच त्यांनी कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.वास्तवातील दाहकता हा त्यांच्या अनुभवविश्वाचा भाग आहे,तो त्यांच्या लिखाणातून दिसतो."
तर डाँ किसन पाटील म्हणतात "ही कथा कथेसाठी ,लेखकासाठी लिहिली गेली नसून जीवन जाणिवांची, ग्रामीण आत्मभानाची आणी व्यवस्थेला जाब विचारणारी ग्रामविद्रोहाची कथा आहे.खानदेशी बोली साहित्यातून उमलणारी ही कथा मातीचा गंध,मातीचा हुंकार, मातीचा आत्मस्वर घेउन साकारलेली आहे.
"गावाकडल्या कविता" हा अशोक कोळींचा पहिलाच काव्यसंग्रह.कथा/कादंबरी प्रमाणेच, शेती,शेतकरी,दुष्काळ, पाऊस, गावातलं राजकारण, धार्मिक-शॆक्षणिक वातावरण आदी ग्रामीण जीवनाशी निगडित विषय कवितेतून मांडले आहेत.
झाला पंचनामा, खुष ह-याना-या
शेवटी हातात, भेटला धतु-या.... किंवा
व्याज भरु भरु,मालक भिकारी
घेउन ट्रँक्टर,गेले अधिकारी....किंवा
उशीरा आमच्या,टकु-यात आलं
राजकारणाचं,गजकर्ण झालं
चांगल्याची केली,ज्यांनी धूळधाण
निपटून काढू,अशी गावघाणं.....किंवा
भंगल देऊळ, हादरला पार.
मानली देवाने,काळापुंढ हार
वाटते देवाले ,माणसाची भीती...
अशा कवितांचे मधून ते व्यक्त होतात.
आपल्या पाडा,कुंधा,कुड,आदी कथा कादंबरी लेखनासाठी ज्या तावडीबोलीचा वापर केला आहे,त्या तावडीबोलीचा परिचय करुन देण्याचे उद्देशाने "तावडीबोली"हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.तावडीबोलीचे अंतरंग,शब्दसंग्रह,म्हणी,वाक्प्रचार,आदींचा पुस्तकातून परिचय करून दिला आहे.शेवटी परिशिष्टात तावडीबोली आणी तावडीतून माणसाचा परिचय,तसेच मराठी साहित्यातून बोलींचा नवसर्जनाविष्कार कसा सुरु आहे हे वाचायला मिळते.
गेल्या वर्षिचे लाँकडाउनचे काळात जे अनुभवल ते
"कडीबंदी"या कथासंग्रहातून व्यक्त झाले आहे.
पुरस्कार -
अशोक कोळींच्या साहित्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.दोन कादंबऱ्याना राज्यशासनाचे पुरस्कार मिळाले आहे.
"कुंधा" कादंबरीला राज्य शासनाचा वि.स.खांडेकर उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला आहे
"पाडा" कादंबरीचे आकाशवाणी जळगाव केन्द्रावरुन क्रमशः अभिवाचन तावडीबोलीतून झाले.तसेच उत्तर महा.विद्यापीठात एम.ए.अभ्यासक्रमात कादंबरीचा समावेश केला . ४थ्या व ६व्या वर्गाच्या बालभारती पाठ्यपुस्तकात अशोक कोळींच्या दोन कविताचा समावेश झाला.
तावडीबोलीच्या प्रेमापोटी जामनेर येथे "तावडीबोली" संमेलनाचे आयोजनही त्यांनी यशस्वीपणे केले.
अशोक कोळी यांच्या कुड, कुंधा,पाडा,रक्तळलेल्या तुरी,आसूड,दप्तर,कडीबंद, डंख,भुईभोग, ह्या साहित्यकृती निश्चितच मनोरंजनात्मक नाहीत. वाचकाला भान विसरून विचार करायला लावणाऱ्या अशा आहेत.शासनाकडून पुरस्कार देऊन अशा साहित्यकृतींचा गौरव केला जातो,पण नुसताच गौरव करुन उपयोग नाही, त्याच बरोबर ,अशा साहित्यकृतीवर निश्चितच विचारमंथन व्हायला हवे आहे.
जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यादानाचे कार्य करणाऱ्या अशोक कोळींचा अजून बरेच लिखाण करण्याचा मानस आहे.त्यांच्या पुढील साहित्य प्रवासास शुभेच्छा. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना आधी होणाऱ्या नांदी संमेलनाचे पाचोरा येथे होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन.!!
**********************************
प्रतिक्रिया (0)