![]()
अमळनेर प्रतिनिधी : सुरत येथे आयोजित ३३ व्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचा समारोप प्रताप महाविद्यालयाचे माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. कुबेर कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली दि. २२ नोव्हेंबर रोजी गरिमामय वातावरणात संपन्न झाला. या संमेलनात देशभरातील हिंदी भाषा, साहित्य आणि प्रचार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सुमारे ५५ मान्यवरांना डॉ. कुबेर कुमावत यांच्या हस्ते ‘अखिल भारतीय हिंदी सेवी’ पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा, गुजरात प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार समिती, अहमदाबाद आणि राष्ट्रभाषा प्रचारक मंडळ, सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने जयदीप शारदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या विशाल प्रांगणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे अध्यक्षस्थान डॉ. कुबेर कुमावत यांनी भूषविले, तर संचालन डॉ. सुरेश नाई यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कुमावत यांनी हिंदी भाषा ही जनसंवाद, राष्ट्रीय एकता आणि सांस्कृतिक चेतनेचे सशक्त माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. हिंदी भाषेचा व्यावहारिक तसेच तांत्रिक क्षेत्रातील विस्तार करण्यासाठी हिंदी भाषासेवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या संमेलनाला देशभरातील शिक्षक, प्राध्यापक, लेखक आणि हिंदी भाषा प्रचारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदी भाषेच्या विकासासाठी, प्रचारासाठी आणि उन्नयनासाठी योगदान देणाऱ्या सुमारे ५५ विभूतींना विविध श्रेणींमध्ये ‘हिंदी सेवी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. यामध्ये साहित्यिकांसह तळागाळात हिंदीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे प्रधानमंत्री डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी स्वागतपर भाषणातून हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. गुजरात प्रांतीय राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मंत्री ॲड. शरद जोशी यांनी हिंदीचे महत्त्व आणि राष्ट्रीय स्तरावरील आवश्यकतेविषयी विचार मांडले. प्रसिद्ध लेखक व अनुवादक डॉ. सुनील देवधर यांनी संमेलनाच्या भव्य आयोजनाचे आणि शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक केले.
यावेळी मध्यप्रदेश साहित्य अकादमीचे निदेशक डॉ. विकास दवे उपस्थित होते. राष्ट्रभाषा प्रचारक मंडळ, सुरतचे अध्यक्ष श्री. अतुल पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सहायक मंत्री महेश अग्रवाल यांनी आभार मानले.
हिंदी भाषेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक संवाद अधिक दृढ करण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.
प्रतिक्रिया (0)