![]()
अकोला*/ *अमरावती - प्राचिन परंपरेतून आलेली बोलीभाषा आईच्या ओठातून आलेली मायबोली आहे. बोलीभाषांमध्ये समृध्द लोकसंस्कृती, परंपरा,जीवनानुभव दडलेले असून ती अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे.मराठी भाषेचे वैभव केवळ प्रमाण भाषेपुरते मर्यादित नसून तिच्या विविध बोलीभाषांमध्ये दडलेले आहे. महाराष्ट्रात वऱ्हाडी,कोकणी,कोल्हापूरी,अहिराणी,
आगरी,पुणेरी,मालवणी,झाळीबोली अशा अनेक ५२ बोलीभाषा असून कर्मयोगी संत गाडगे बाबा आणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुध्दा समाज प्रबोधनासाठी याच बोलीभाषेचा वापर केलेला आहे.म्हणून मौलिक मौलिक वारशाचे जतन,संवर्धन होऊन त्या टिकविण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे.असे प्रखर भाषाभिमानी प्रतिपादन ज्येष्ठ वऱ्हाडी साहित्यिक व पहिल्या बोलीभाषा राष्ट्रीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.आबासाहेब कडू यांनी केले.
प्रा.देवबाबू उर्फ महादेव लूले यांनी स्थापन केलेल्या अकोला येथील बोलीभाषा साहित्य संस्थेच्या वतीने पहिल्या बोलीभाषा राष्ट्रीय साहित्य संमेलन अमरावती येथील कर्मयोगी संत गाडगे बाबा समाधी मंदिराच्या हॉलमध्ये दि.२२ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले.या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय सदस्या व ज्येष्ठ साहित्यिका, मा.डॉ.शोभाताई रोकडे या उद्घाटक म्हणून डॉ.प्रमोद काकडे स्वागताध्यक्ष तर कार्याध्यक्ष म्हणून लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांची विचारमंचावर उपस्थिती होती.या संमेलनात कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे, मा.प्राध्यापक सदाशिव शेळके,मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य मा.प्रा.डॉ.राजेश मिरगे,वाशीम चे ज्येष्ठ सेवाव्रती मा.गिरधारीलाल सारडा, मा.दिलीप बदकी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.देवबाबू लूले आणि सहकाऱ्या नियोजनाअभावी झालेल्या या अनोख्या उक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.
विविध बोली भाषेच्या ईतर राज्यातून आलेल्या आणि ईतर साहित्यिकांच्या तथा रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेले हे एक ऐतिहासिक संमेलन होते.सकाळच्या ग्रंथदिंडी मध्ये सजवलेली बैलबंडी आणि बंजारा महिलांचे नृत्य या संमेलनाचे विशेष आकर्षण होते.भाषा समृद्धीच्या उदात्त उध्देशासोबतच बोलीभाषा नव्या विविधतेतील एकतेचा संगम घडविणारा सारस्वतांच्या प्रांगणातील साहित्यिकांचा हा एक समतेचा अनोखा स्नेहमिलन मेळावा होता.
संत गाडगेबाबा साहित्य नगरी मध्ये स्व. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग विचारपीठावर अमरावती येथे दिवसभर चाललेल्या या संमेलनाला राज्यभरातून आलेल्या साहित्यिक व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*ग्रंथदिंडी व उद्घाटन सोहळा*
सकाळी ८ वाजता भव्य ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. डॉ. राजेश मिरगे, सौ. मिरगे, ॲड. ललित कदम, सौ. कदम, मधुकर बनसोड, सौ. मधुराणी बनसोड व मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. ग्रंथादिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाडी आणि पारंपरिक वैशाभूषेतील बंजारा महिलांनी वाद्यांच्या तालावर केलेली नृत्यकला होती. सकाळी १० वाजता पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन मा. डॉ. शोभा रोकडे यांच्या हस्ते झाले. या सत्रात सागर लोडम संपादित *'वऱ्हाडवृत्त"* या साहित्य संमेलन विशेषांकाचे कवी ओंकार राठोड यांच्या 'गीदेरो पेटारा' या बंजारा बोली बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
या संमेलनात बोलीभाषा साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे यांना प्रतिष्ठेचा ‘बोलीभाषा जीवनगौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध बोलीभाषेतील 'साहित्यरत्न पुरस्कार' मंगला रोकडे (अहिराणी), माधुरी चौधरी (लेवागणबोली), गणेश आघाव (मराठवाडी), शिवलिंग काटेकर (वऱ्हाडी), सुनिल बावणे (झाडीबोली), डॉ. बाळकृष्ण लळीत (मालवणी), डॉ. विनय दांदळे (अभिजात मराठी) आणि डॉ. शांतीलाल चव्हाण (बंजारा बोली) यांना प्रदान करण्यात आले. डॉ. मनोहर घुगे यांना 'वैद्यकीय सेवारत्न पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रा. संजय भोयर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथ पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धा व स्तंभलेखन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
विविधबोलीभाषेतील बहारदार कविसंमेलनाला रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद
दुपारनंतर संमेलनात सलग तीन कवी संमेलनाचा आस्वाद रसिकांना घेता आला. याशिवाय परिसंवाद आणि कथाकथानसारख्या कार्यक्रमांसाठी याऩतरचे संमेलन दोन दिवस ठेवण्याचे मनोदय यावेळी आयोजकांकडून व्यक्त झाले.
*पहिले कविसंमेलन* जेष्ठ नाट्यकर्मी रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यात अहिराणी, बंजारा, झाडीबोली आणि वऱ्हाडी कवींनी बहारदार रचना सादर झाल्या.
*दुसरे कविसंमेलन* (कवयित्री संमेलन): निता कचवे यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या या सत्रात राज्यातील नामवंत कवयित्रींनी आपल्या कवितांमधून स्त्री जीवन व बोलीभाषेचे सौंदर्य उलगडले.
*तिसरे कविसंमेलन* श्री. दिवाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रात कलाली बोलीसह विविध प्रादेशिक बोलींतील कवींनी श्रोत्यांची मने जिंकली. दुष्काळ,पाणीटंचाई आणि शेतकरी जीवनाच्या व्यथा अनेक कवींनी आपल्या रचनांमधून मांडल्या
*समारोप सोहळा*
सायंकाळी ६ वाजता ॲड. ललित कदम यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप झाला. यावेळी सतीश जामोदकर, मारुती पुनसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. महादेव लुले(देवबाबू) यांनी काही ठराव मांडले.
संमेलन यशस्वी करण्यासाठी बोलीभाषा साहित्य संस्थेचे अध्यक्ष प्रा. महादेव लुले (देवबाबू), उपाध्यक्ष प्रा. डॉ. ममता इंगोले, संजय देशमुख,(पत्रकार)सचिव युवराज टोपले, कोषाध्यक्ष उज्वला कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सागर लाहोळकर, संघटक किशोर बुजाडे, कार्यवाहक तथा सदस्य पवन वसे आणि सर्व संयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन युवराज टोपले, सौ. प्रिया माकोडे, मंगलसिंग राठोड, सौ. भारती राठोड, सागर लाहोळकार, ओंकार राठोड, पवन वसे, किशोर बुजाडे, रजनी बावस्कर, सिमा निघोट यांनी केले, तर आभार दिलीप बमनोटे यांनी मानले.
प्रतिक्रिया (0)