![]()
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील मांडळ व पांझरा नदी परिसरातील शेतशिवारात केबल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, विहिरी, बोअरवेल तसेच वीज खांबांवरील अॅल्युमिनियम तारांची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांचे आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे कंबरडे मोडले असताना, त्यात केबल चोरीच्या घटनांमुळे शेतीपंप बंद पडत आहेत. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
नदीकाठच्या शेतशिवारातून दररोज १० ते १२ शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल व वीज खांबांवरील तारा चोरीला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी महावितरण कंपनीने रात्रीच्या वेळी शेतीपंपांसाठी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील चोरी, अवैध धंदे व अन्य गैरप्रकारांना आळा घालून संबंधित चोरट्यांचा दोन ते तीन दिवसांत बंदोबस्त करावा तसेच चोरीला गेलेल्या तारा व केबल परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पुढील आठ दिवसांत या प्रकारांना आळा न घातल्यास सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील, युवासेना शहराध्यक्ष प्रवीण पाटील, दिनेश भोई, राजेंद्र महाजन, निखिल पाटील, योगेश पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीच्या घटनांना आळा घालून त्यांना दिलासा देण्यासाठी पोलीस प्रशासन व महावितरणने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया (0)