अमरावती प्रतिनिधी: आपल्या माय मराठी भाषेच्या वैविध्याचा व देशातील इतरही बोलीभाषेचा गौरव करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या बोलीभाषेच्या साहित्यिकांना एकत्र आणून बोलीभाषेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी अकोल्याच्या बोलीभाषा साहित्य संस्थेने 'पहिले राष्ट्रीय बोलीभाषा साहित्य संमेलन २०२६' चे भव्य आयोजन केले आहे. हे संमेलन रविवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी अमरावतीच्या गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरातील भव्य सभागृहात 'स्व. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग' विचारपीठावर संत गाडगे बाबा साहित्य नगरीत संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ वऱ्हाडी साहित्यिक मा. आबासाहेब कडू भूषविणार असून उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विश्वस्त व राष्ट्रीय कवयित्री मा. डॉ. शोभा रोकडे उपस्थित राहणार आहेत.
स्वागताध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक व अंकुर साहित्य संघाचे माजी अध्यक्ष मा. डॉ. प्रमोद काकडे सांभाळणार आहेत.आयोजकांनी या संमेलनाचे काळजाच्या कोंट्यातून आवतन दिलेले असून या एक दिवशीय संमेलनात रसिकांआठी एकापाठोपाठ एका भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे.
संमेलनाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता पारंपारिक पालखी सोहळ्याने थाटात निघणाऱ्या ग्रंथदिंडीने होईल, ज्याचे उद्घाटन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. राजेश मिरगे, सौ. मिरगे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते होईल. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता पहिल्या सत्रात संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडेल, ज्यामध्ये बंजारा गोरबोलीत स्वागत गीत सादर केले जाईल, कवी ओंकार राठोड यांच्या 'गीदेरो पेटारा' या बालकाव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशनही यावेळी होणार आहे.महाराष्ट्रासह भारतातील वेगवेगळ्या बोलीभाषेतील साहित्यिकांना 'साहित्यरत्न पुरस्कार' देऊन गौरवण्यात येईल. दुपारी १२.०० वाजता संमेलनाला आलेल्या सर्व मंडळींसाठी अंगतपंगत असेल.पंगत आटोपल्यावर दुपारी १२.३० वाजता दुसरे सत्र सुरू होईल, ज्यामध्ये सिनेफोटोग्राफर, चित्रपट कलावंत व निर्माते असलेले मा. दयारामजी निंबोळकर, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. संजय भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धा पुरस्कार आणि साप्ताहिक व मासिक स्तंभलेखन पुरस्कारांचे सन्मानपूर्वक वितरण केले जाईल.
पुरस्कार सोहळ्यानंतर दुपारी १.०० वाजता तिसऱ्या सत्रात 'पहिले कविसंमेलन' होईल, ज्याचे अध्यक्ष यवतमाळ येथील सुप्रसिद्ध हास्यकवी मा.डॉ. स्वप्नील मानकर हे असतील. यामध्ये बंजारा, अहिराणी, झाडीबोली, मराठवाडी, नागपुरी, गुजराती व उर्दूसह विविध बोलीभाषेचे कवी आपल्या कविता सादर करतील. हे कविसंमेलन संपताच दुपारी २.३० वाजता चौथ्या सत्रात 'दुसरे कविसंमेलन' सुरू होईल, ज्याचे अध्यक्षपद कवयित्री अॅड. स्नेहाराणी गायकवाड भूषवतील. या सत्रात वेगवेगळ्या बोलीभाषेतील नामवंत कवयित्रींचे धडाकेबाज सादरीकरण होईल. त्यानंतर दुपारी ४.०० वाजता पाचव्या सत्रात 'तिसरे कविसंमेलन ' रंगेल. ज्याचे अध्यक्ष मराठी मायबोली कार्यक्रमाचे हास्यकवी श्री. दिवाकर देशमुख राहतील. यात कलाली बोलीसह इतर अनेक बोलीभाषेचे कवी सहभागी होऊन आपल्या रचना सादर करतील.सर्वात शेवटी संध्याकाळी ६.०० वाजता सहाव्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक व कवी मा.अरुण विघ्ने यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप समारंभ पार पडेल, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कवी मा.प्रा. संजय कावरे, कवी मा.सतिश जामोदकर,कवी मा.योगीराज मस्के हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील मा. श्यामकुमार घुगे यांचे सूत्रसंचालन असेल. अभियंता कवी मा.दिलीप बमनोटे यांच्या आभाराने संमेलनाची सांगता होईल.
बोलीभाषेचा जागर होणाऱ्या या ऐतिहासिक पहिल्या राष्ट्रीय बोलीभाषा संमेलनासाठी आयोजक समितीचे अध्यक्ष प्रा. महादेव लुले (देवबाबू),बोलीभाषा साहित्य संस्था अकोलाच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. ममता इंगोले, उपाध्यक्ष संजय एम. देशमुख, मार्गदर्शक मा.पुष्पराज गावंडे, सचिव मा.युवराज टोपले, कोषाध्यक्ष मा.उज्वला कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सागर लाहोळकार, संघटक किशोर बुजाडे, सदस्य तथा कार्यवाहक पवन वसे या सर्वांनी अमरावतीच्या बोलीभाषा प्रेमी व रसिक श्रोत्यांना उदघाटन समारंभ व सर्व बोलीभाषेतील कविसंमेलनाचा आनंद घ्यायला काळजाच्या कोंट्यातून आवतन दिलेले असून रसिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन केलेले आहे.
प्रतिक्रिया (0)