अमळनेर :प्रतिनिधी
राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसागणिक भयावह होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येथील मंगळग्रह सेवा संस्था या सामाजिक जाणिवेचे उचित भान राखणाऱ्या संस्थेतर्फे दिवाळीपर्वाच्या सुरूवातीला ‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया... त्यांचे घरही आनंदाने प्रकाशमान करूया!’ असे आवाहन केले आहे.
या अभिनव उपक्रमास मंगळवार, दि. 3 नोव्हेंबरपासून सकारात्मक प्रतिसाद मिळणे सुरू झाले आहे. धुळे जिल्ह्यातील काळखेडे येथील मूळ रहिवासी व धुळे येथील वाडीभोकर रोडवरील डिजिटल मार्केटिंग ॲण्ड डिझायनिंग व्यवसाय करणारे लोटन शरद पाटील (कचवे) व त्यांच्या मातोश्री
गं. भा. मथुराबाई पाटील यांनी आज दातृत्व आणि कर्तृत्व दाखवत माणुसकीची पणती पेटवत स्वखर्चाने आणलेला दिवाळी फराळ मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केला.
श्री. लोटन पाटील यांच्या हाती आजच अमळनेरसह जळगाव व धुळे जिल्ह्यात वृत्तपत्रांतून वितरीत करण्यात आलेले भावनिक आवाहनाचे पॉम्प्लेट वाचले. त्यानंतर तत्काळ आपल्या मातोश्रींसमवेत दिवाळी फराळ घेऊन आज श्री मंगळग्रह मंदिर मंदिर गाठले. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व डी. ए. सोनवणे यांनी श्री. पाटील यांनी आणलेला हा दिवाळी फराळ आदरपूर्वक स्वीकारला. त्यानंतर श्री. पाटील व त्यांच्या मातोश्रींनी जपलेल्या या सकारात्मक सेवाभावाचे विश्वस्त मंडळाकडून तोफ्लडभरून कौतुक करण्यात येऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेला मिळतोय भरभरून प्रतिसाद आणि होतेय कौतुक
प्रतिक्रिया (0)