![]()
पारोळा प्रतिनिधी : पारोळा येथील राजे संभाजी माध्यमिक शाळेत १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेले १० दिवसीय वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा स्तरांनुसार दोन वर्गांमध्ये या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारोळा पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधीक्षक सी. एम. चौधरी होते. यावेळी व्यासपीठावर राजे संभाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश पाटील, उंदिरखेडे केंद्राचे केंद्रप्रमुख सचिन ह्याळींगे, मार्गदर्शक व्ही. ए. सोनवणे, मिलिंद मोरे, प्रशांत शिसोदे, एम. एस. पाटील, निलेश पाटील, बी. आर. माळी, स्वप्निल सरदार, स्वप्निल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या दहा दिवसांच्या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षण क्षेत्रात होणारे बदल, विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम, अध्यापनाच्या आधुनिक पद्धती आणि शिक्षकांसमोरील आगामी आव्हाने यावर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान गटशिक्षणाधिकारी दामिनी चौधरी, डायटचे अधिव्याख्याता शिवाजीराव ठाकूर आणि विस्तार अधिकारी विश्वासराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
समारोपप्रसंगी प्रशिक्षणार्थी शिक्षकांमधून स्वप्निल पवार (राजवड), ज्ञानेश्वर पाटील, सचिन चव्हाण, शिवचरण पवार, प्रशांत पाटील, उर्मिला मोरे, शिरसमणीचे मुख्याध्यापक जितेंद्र पाटील आणि टिटवीच्या सुरेखा पाटील यांनी प्रशिक्षणातील अनुभव व मनोगत व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना अद्ययावत ज्ञान, कौशल्ये आणि अध्यापनाच्या आधुनिक दृष्टिकोनाने सक्षम करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण उपयुक्त ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रतिक्रिया (0)