फवारणीसाठी पाणी भरताना विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ,कळमसरे येथील घटना; घरातील कर्त्या मुलाच्या निधनाने गावात शोककळा
![]()
फवारणीसाठी पाणी भरताना विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
कळमसरे येथील घटना; घरातील कर्त्या मुलाच्या निधनाने गावात शोककळा
अमळनेर प्रतिनिधी :
कळमसरे (ता. अमळनेर) येथील शेतकरी दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) यांचा स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी पाणी भरत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाबाहेरील गणपती मंदिर परिसरातील विहिरीवर घडली.
दीपक राजपूत हे बैलगाडीसह शेतात जात असताना फवारणी पंपात पाणी भरण्यासाठी गणपती मंदिराजवळील विहिरीवर थांबले होते. चार-पाच बादल्या पाणी काढल्यानंतर शेवटची बादली काढत असताना त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले.
ही बाब मंदिराशेजारील किशोर हरी मालचे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने गावातील नातेवाईकांना माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने दीपक यांना विहिरीतून बाहेर काढून त्वरित अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील व सरपंच यांनी घटनास्थळी पंचनामा करून मारवड पोलिसांना कळविले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपक यांच्या पश्चात आई, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. घरातील कर्ता मुलगा अकाली गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक साजित मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील पुढील तपास करीत

