विवाह नोंदणी दाखल्यावर QR कोड नाही; अमळनेरकरांची गैरसोय! ,ऑनलाईन प्रणाली पुन्हा सुरू करण्याची काँग्रेसची मागणी; सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
![]()
विवाह नोंदणी दाखल्यावर QR कोड नाही; अमळनेरकरांची गैरसोय!
ऑनलाईन प्रणाली पुन्हा सुरू करण्याची काँग्रेसची मागणी; सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील नागरिकांना विवाह नोंदणीचे ऑनलाईन व QR कोडयुक्त दाखले मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या तातडीने दूर करून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन विवाह नोंदणी प्रणाली सुरू करावी, अशी मागणी अमळनेर शहर काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अमळनेर नगरपरिषदेकडे पूर्वी विवाह नोंदणीची ऑनलाईन कार्यप्रणाली सुरळीतपणे सुरू होती. मात्र केंद्र व राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी ही कार्यप्रणाली नगरपरिषदेकडून वर्ग करून ग्रामीण रुग्णालय, अमळनेर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात ऑनलाईन विवाह नोंदणीची प्रणाली उपलब्ध नसल्याने नागरिकांना सध्या केवळ साधे छापील दाखले दिले जात असल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर QR कोडयुक्त ऑनलाईन विवाह नोंदणी दाखले उपलब्ध होत असताना शहरातील नागरिकांना मात्र QR कोड नसलेले दाखले मिळत आहेत. काही शासकीय कार्यालये तसेच खासगी संस्थांमध्ये QR कोडयुक्त दाखल्यांची आवश्यकता भासत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नगरपरिषदेकडील जुने Software पुन्हा वापरण्याची मागणी
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता, महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही नगरपरिषदेकडून ग्रामीण अथवा शासकीय रुग्णालयांकडे विवाह नोंदणीचे काम वर्ग झाल्यानंतर अशाच प्रकारच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याबाबत शासनाकडून अद्याप निर्देश प्राप्त नसल्याचेही सांगण्यात आल्याचे काँग्रेसने नमूद केले.
यावर उपाय म्हणून नगरपरिषद अमळनेरकडे पूर्वीपासून उपलब्ध असलेली ऑनलाईन Software प्रणाली व QR कोडची सुविधा ग्रामीण रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासाठी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी सूचना काँग्रेसने केली आहे. ही कार्यप्रणाली अमळनेरमध्ये सुरू झाल्यास त्याचे अनुकरण महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही करता येईल आणि नागरिकांची गैरसोय दूर होऊ शकेल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
“निर्णय न झाल्यास मोठे आंदोलन”
नागरिकांच्या या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास अमळनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, पी. वाय. पाटील, विशाल पाटील, डॉ. रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, तेली भिकाजी पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

