आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वीज प्रश्नावर झाली महत्त्वपूर्ण बैठक;,  कृषी पंपांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना
1 min read

आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वीज प्रश्नावर झाली महत्त्वपूर्ण बैठक;, कृषी पंपांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना

Loading

आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वीज प्रश्नावर झाली महत्त्वपूर्ण बैठक;

कृषी पंपांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना

अमळनेर प्रतिनिधी
-अमळनेर विधानसभा मतदारसंघातील वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या, विशेषतः कृषी पंपांना दिवसा सुरळीत व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत दि. ११ सप्टेंबर रोजी आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगिरे (धरणगाव विभाग), ज्ञानेश्वर अंबाडकर (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अमळनेर शहर उपविभाग), मनोज भावसार (उपकार्यकारी अभियंता, अमळनेर ग्रामीण उपविभाग), अविनाश सूर्यवंशी (सहाय्यक अभियंता, पायाभूत आराखडा, धरणगाव), तसेच सहाय्यक अभियंते चैतन्य वाघ, विनायक बोरसे व अमित चव्हाण उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील विद्यमान वीज वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या एकूण १४ ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्रे कार्यरत असून वाढती वीज मागणी आणि विशेषतः कृषी क्षेत्रातील वाढता भार लक्षात घेता यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

*६ ठिकाणी अतिरिक्त रोहित्र, कामे प्रगतीपथावर*

तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ६ उपकेंद्रात नवीन अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर (PTF) मंजूर करण्यात आले आहेत. यात ३३ केव्ही वावडे, ३३ केव्ही अंतुर्ली, ३३ केव्ही जानवे, ३३ केव्ही कलमसरे, ३३ केव्ही सरबेटे आणि ३३ केव्ही भरवस या उपकेंद्रांचा समावेश आहे. ही सर्व कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संबंधित उपकेंद्रांवरील भाराचे योग्य नियोजन होऊन वीज वितरण क्षमता वाढणार आहे.

*चार कृषी वाहिन्यांसाठी विशेष उपाययोजना*

तालुक्यातील ३३ केव्ही जानवे, सरबेटे, कळमसरे व गांधली या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या कृषी वाहिन्यांवरील कृषी पंपांना सध्याच्या वाढत्या भारामुळे दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करणे आव्हानात्मक ठरत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या चारपैकी तीन उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी ५ MVA क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे कामही नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यामुळे कृषी वाहिन्यांवरील भाराचे व्यवस्थापन शक्य होणार आहे.

*३३ केव्ही शिरूड येथे नवीन उपकेंद्र*

वीज वितरण अधिक मजबूत करण्यासाठी ३३ केव्ही शिरूड येथे नवीन उपकेंद्रास मंजुरी देण्यात आली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील वीज वितरणावरील भाराचे विभाजन होऊन पुरवठ्याची विश्वासार्हता वाढेल आणि भविष्यातील वाढती कृषी, घरगुती व व्यावसायिक मागणी भागविता येईल.

*कृषी क्षेत्राला दिवसा सक्षम वीजपुरवठ्यावर भर*

बैठकीत शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा मिळणारा वीजपुरवठा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी उपकेंद्रांची क्षमता वाढवणे, अतिरिक्त रोहित्र बसवणे, नवीन उपकेंद्रे उभारणे आणि विद्यमान यंत्रणेचे बळकटीकरण या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सदर सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व अभियंत्यांना आमदारांकडून देण्यात आल्या असून नोव्हेंबर २०२६ अखेर ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर अमळनेर तालुक्यातील कृषी पंपांना दिवसा अधिक सक्षम व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *