मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा; अवैध वाळू वाहतुकीचे ६ ट्रॅक्टर जप्त! अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई; चालक ताब्यात, मूळ मालकांचा शोध सुरू
![]()
मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा; अवैध वाळू वाहतुकीचे ६ ट्रॅक्टर जप्त!
अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई; चालक ताब्यात, मूळ मालकांचा शोध सुरू
अमळनेर प्रतिनिधी :
अवैध गौणखनिज (वाळू) चोरीविरोधात अमळनेर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत हिंगोणे येथील बोरी नदीपात्रातून विना परवाना विना पास वाळूची चोरटी वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केले. या कारवाईत सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ट्रॅक्टरच्या मूळ मालकांचा शोधही पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांनी अवैध गौणखनिज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
दि. २८ जुलै २०२६ रोजी पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान पोहेकॉ. सुनील तेली, पोकॉ. विनोद संदानशिव, पोकॉ. मयूर पाटील तसेच प्रमोद बागडे, हितेश बेहरे आणि गणेश पाटील यांच्या पथकाने हिंगोणे गावातील बोरी नदीपात्रात छापा टाकला. यावेळी पाच विना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि MH-19 CJ-0775 क्रमांकाचा एक ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण सहा ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आले.
कारवाईदरम्यान योगेश नामदेव भोई, प्रविण सुधाकर सोनवणे, राहुल छोटू ठाकरे, अर्जुन अशोक मालचे, सतीष मोहन बावीस्कर आणि सोमनाथ मधुकर मोरे या चालकांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, अमळनेर तालुक्यात अवैध गौणखनिज चोरी व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच कठोर आणि सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाया सुरू राहतील.

