“दादा” नावाचा आधारवड हरपला… देवगाव-देवळीतील जेष्ठ नेते मा. नवलदादा पाटील यांचे दुःखद निधन , आज देवगाव देवळी येथील राहत्या घरून दुपारी चार वाजता निघणार अंतयात्रा
![]()
“दादा” नावाचा आधारवड हरपला…
देवगाव-देवळीतील जेष्ठ नेते मा. नवलदादा पाटील यांचे दुःखद निधन
आज देवगाव देवळी येथील राहत्या घरून दुपारी चार वाजता निघणार अंतयात्रा
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी (ता. अमळनेर) येथील माजी सरपंच तथा देवगड देवळी एज्युकेशन सोसायटी, धुळे संचलित महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे उपाध्यक्ष मा. नवलदादा उर्फ नवल बाबुराव पाटील (वय 94) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरून, देवगाव देवळी (ता. अमळनेर) येथून निघणार आहे.
गावाच्या विकासाचा पाया घालणारे, समाजसेवेची अखंड ज्योत जपणारे आणि प्रामाणिकपणा-सचोटीचे जिवंत उदाहरण ठरलेले नवलदादा यांचे कार्यकाल खरोखरच उल्लेखनीय होता. देवगाव देवळी ग्रामपंचायतीत तब्बल वीस वर्षे सरपंच पदाची धुरा समर्थपणे सांभाळत त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी स्वतःला वाहून घेतले.
पैशाच्या मागे कधी न धावता, समाजाच्या सेवेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणारा हा “दादा” प्रत्येकाच्या मनात घर करून गेला. त्यांचा मित्रभाषी, रोखठोक आणि आपुलकीचा स्वभाव यामुळे ते केवळ देवगाव-देवळीपुरतेच नव्हे, तर संपूर्ण परिसरात “दादा” म्हणून ओळखले जात होते.
“दादांचा 101 वा वाढदिवस साजरा करायचा आहे” असे मित्रमंडळींचे स्वप्न होते; मात्र दादा नेहमी हसत म्हणायचे, “आता मी थकलो… भरपूर झालं…” — आणि आज त्यांच्या जाण्याने त्या आठवणींना भावनिक किनार लाभली आहे.
जिथे जिथे दादा गेले, तिथे प्रत्येकाची विचारपूस करणे, प्रत्येकाशी जिव्हाळ्याने बोलणे, हा त्यांचा स्वभाव सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.
त्यांच्या निधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील, सचिव सौ. मंदाकिनी पाटील, सर्व विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
अध्यक्ष विलासराव पाटील म्हणाले, “देवगाव-देवळीचे खरे ‘दादा’ म्हणजे नवलदादा पाटील होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रासाठी स्वतःला समर्पित केले.”
तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, माजी सरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे पदाधिकारी व संपूर्ण ग्रामस्थांनीही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


