गुरुभक्तीचा हृदयस्पर्शी आविष्कार; विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेला साकारली शिक्षकांची जिवंत प्रतिमा
![]()
गुरुभक्तीचा हृदयस्पर्शी आविष्कार; विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेला साकारली शिक्षकांची जिवंत प्रतिमा
ज्ञानदा सायन्स क्लासेसच्या कु. निशा महाजनचा अनोखा गुरुदक्षिणेचा सन्मान; संचालक धीरजकुमार पवार भावूक, विद्यार्थी-गुरू नात्याचा आदर्श ठरला क्षण
अमळनेर प्रतिनिधी : आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात गुरू-शिष्य नात्यातील आत्मीयता कमी होत असल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र ज्ञानदा सायन्स क्लासेसच्या इयत्ता दहावीतील गुणी विद्यार्थिनी कु. निशा महाजन हिने गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपल्या गुरूप्रती असलेली कृतज्ञता एका वेगळ्याच पद्धतीने व्यक्त करत सर्वांची मने जिंकली.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिने स्वतःचा पूर्ण दिवस खर्च करून ज्ञानदा सायन्स क्लासेसचे संचालक धीरजकुमार पवार यांची अत्यंत सुंदर, जिवंत भासणारी प्रतिमा रेखाटली. ही प्रतिमा केवळ एक कलाकृती नसून विद्यार्थिनीच्या मनातील गुरूप्रतीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावपूर्ण अभिव्यक्ती ठरली.
ही प्रतिमा पाहून संचालक धीरजकुमार पवार भावूक झाले. त्यांनी सांगितले की, “शिक्षकांवर जिवापाड प्रेम करणारे आणि आपल्या गुरूंना आदर्श मानणारे विद्यार्थी आजच्या काळात कमी होताना दिसतात. अशा वेळी निशा महाजन हिने गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिलेला हा सन्मान माझ्यासाठी अमूल्य आहे. हा क्षण आणि तिच्याकडून मिळालेली ही सुंदर प्रतिमा माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. तिचे मनःपूर्वक आभार.”
ज्ञानदानाचे कार्य हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या मनात संस्कार, मूल्ये आणि आदराची भावना रुजविण्याचे कार्यही शिक्षक करीत असतात. अशा शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता ही समाजासाठी प्रेरणादायी ठरते. कु. निशा महाजन हिने आपल्या कलेतून व्यक्त केलेली गुरुभक्ती ही गुरू-शिष्य परंपरेतील निखळ प्रेमाचे आणि भारतीय संस्कृतीतील गुरुतत्त्वाच्या महत्त्वाचे सुंदर उदाहरण ठरले आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थिनीने दिलेली ही अनोखी गुरुदक्षिणा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली असून, शिक्षण क्षेत्रात गुरू-शिष्य नात्याचा आदर्श जपणारा हा प्रेरणादायी प्रसंग म्हणून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

