मिशन भरारी”ची झेप इस्रोकडे; ठाण्यातील 59 विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
![]()
“मिशन भरारी”ची झेप इस्रोकडे; ठाण्यातील 59 विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
ठाणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 59 विद्यार्थ्यांना “मिशन भरारी” या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत इस्रोमध्ये (ISRO) प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विश्वाशी जोडण्याचा हा अभिनव उपक्रम ठरत आहे.
जानेवारी 2026 मध्ये संकल्पित या योजनेला ठाणे जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे 300 विद्यार्थ्यांमधून विविध स्पर्धांच्या आधारे गुणवत्ता व मेरिटच्या निकषांवर अंतिम 59 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, 27 एप्रिल 2026 रोजी हिरवा झेंडा दाखवत त्यांना शुभेच्छांसह रवाना करण्यात आले.
यावेळी कोकण विभागाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार बालाजी किणीकर, आमदार किसन कथोरे, आमदार राजेश मोरे, आमदार कुमार आयलाणी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मिशन भरारी”च्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ, अभियंता, वैमानिक होण्याची प्रेरणा मिळणार असून, विकसित भारताच्या दिशेने ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
दरम्यान, पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात विविध महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. शासकीय जमिनीवर घर बांधलेल्या गोरगरिबांना घरकुलांचे नियमितीकरण करण्याच्या योजनेचा आढावा, खरीप हंगामाची तयारी, दिशा समिती बैठक तसेच “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” उपक्रमांतर्गत आरोग्यविषयक नियोजन यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे प्रशासन आणि जनतेत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.


