धुळे दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; नशामुक्ती प्रतिज्ञेत उत्स्फूर्त सहभाग
![]()
धुळे दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; नशामुक्ती प्रतिज्ञेत उत्स्फूर्त सहभाग
धुळे प्रतिनिधी | दि. ७ सप्टेंबर २०२६
धुळे : शहरातील अलहेरा उर्दू मीडियम हायस्कूल, जामचा मळा येथे नशामुक्ती प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेट्रोलिंगदरम्यान धुळे दामिनी पथकाने कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांना नशामुक्तीबरोबरच सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत दामिनी पथकाने सविस्तर माहिती दिली. सायबर क्राइम म्हणजे इंटरनेट किंवा मोबाइलच्या माध्यमातून होणारे विविध प्रकारचे गुन्हे असून, अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
फर्जी कॉल, मेसेज व लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन
ऑनलाइन फ्रॉडच्या वाढत्या प्रकारांबाबत विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या. फर्जी फोन कॉल, संशयास्पद मेसेज, बनावट लिंक किंवा वेबसाइटच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
तसेच OTP, PIN, पासवर्ड, एटीएम किंवा बँक खात्याची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये, अशी स्पष्ट सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली. कोणतीही बँक किंवा अधिकृत संस्था फोनवरून गोपनीय माहिती मागत नाही, याबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
सोशल मीडिया वापरताना वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर भर
फेसबुक, इन्स्टाग्राम यांसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो, मोबाईल क्रमांक, पत्ता, शाळेची माहिती किंवा अन्य वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. अनओळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत तसेच संशयास्पद अकाउंटपासून दूर राहावे, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
अनजान लिंक किंवा संशयास्पद वेबसाइटवर क्लिक केल्यास मोबाइल किंवा वैयक्तिक खात्यांची माहिती धोक्यात येऊ शकते. त्यामुळे लिंकची खात्री केल्याशिवाय त्यावर क्लिक करू नये, असे दामिनी पथकाने स्पष्ट केले.
सायबर बुलिंगविरोधात विद्यार्थ्यांना जागरूकता
ऑनलाइन माध्यमातून एखाद्याला त्रास देणे, धमकावणे किंवा अपमानास्पद संदेश पाठविणे याला सायबर बुलिंग म्हणतात. अशा प्रकारचा त्रास सहन करताना गप्प बसू नये. तातडीने पालक, शिक्षक किंवा विश्वासातील मोठ्या व्यक्तीला याबाबत माहिती द्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास ती लपवून न ठेवता तातडीने कुटुंबीय, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घ्यावी, असेही सांगण्यात आले.
दामिनी पथकाच्या पथकाने घेतला सहभाग
या कार्यक्रमात धुळे दामिनी पथकातील पोलिस अंमलदार खुशाल दाभाडे, महिला पोलिस अंमलदार मृणालिनी भावसार, नीता डाबेराव व भारती मोहने, तसेच चालक चिराग शेख यांनी सहभाग घेतला.


कार्यक्रमात मृणालिनी सुनील भावसार यांनी सायबर क्राइम, दामिनी पथक आणि महिला सुरक्षा या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नशामुक्तीची प्रतिज्ञा घेत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा तसेच सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला.
स्थळ : अलहेरा उर्दू मीडियम स्कूल, जामचा मळा, धुळे.

