युवांना योग्य दिशा देण्यासाठी रोटरीने पुढाकार घ्यावा’ — ॲड. उज्ज्वल निकम , रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात , नूतन अध्यक्षपदी रोटे. महेश पाटील, सचिवपदी रोटे. प्रशांत निकम; खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती
![]()
युवांना योग्य दिशा देण्यासाठी रोटरीने पुढाकार घ्यावा’ — ॲड. उज्ज्वल निकम
रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात
नूतन अध्यक्षपदी रोटे. महेश पाटील, सचिवपदी रोटे. प्रशांत निकम; खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण समारंभ नर्मदा रिसॉर्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटे. ॲड. रुपेश पाटील तसेच रोटे. गनी मेमन, जळगाव यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी परिवारातील दिवंगत सदस्य तसेच साने गुरुजी स्मारकाचे संस्थापक व माजी प्राचार्य अरविंद सराफ यांच्यासह दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
मावळते अध्यक्ष रोटे. देवेंद्र कोठारी यांनी मागील वर्षभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सेवाभावी उपक्रमांचा कार्यअहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांच्याकडे रोटरीची कॉलर, चार्टर व हॅमर प्रदान करून अध्यक्षपदाचा पदभार सोपविला. तसेच मावळते सचिव रोटे. आशिष चौधरी यांनी नूतन सचिव रोटे. प्रशांत निकम यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपविली.
पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आगामी काळात रोटरीच्या माध्यमातून अधिक प्रभावी सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. असिस्टंट गव्हर्नर ॲड. रुपेश पाटील यांनी RI डिस्ट्रिक्ट 3030 चे गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखविला.
यावेळी प्रमुख पाहुणे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते रोटे. मकसूद बोहरी यांनी संपादित केलेल्या ‘सेवाचक्र’ या रोटरी बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले.
रोटरी इन्क्लेव्हच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
RI डिस्ट्रिक्ट 3030 मधील रोटरी इन्क्लेव्हच्या सेक्रेटरीपदी रोटे. कीर्तीकुमार कोठारी, तर जॉईंट सेक्रेटरीपदी रोटे. प्रीतपाल सिंग बग्गा यांची निवड करण्यात आली. या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा प्रमुख पाहुणे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘युवांना योग्य मार्गदर्शनाची गरज’ — खासदार ॲड. उज्ज्वल निकम
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खासदार ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले, “समाजाचे आपण काही देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोटरीचे सेवाकार्य जगभर सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांसह विविध सामाजिक उपक्रम रोटरीच्या माध्यमातून राबविले जातात. मात्र, आजचा युवा वर्ग विविध कारणांमुळे भरकटताना दिसत आहे. अशा तरुणांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि सकारात्मक दिशा देण्याचे काम रोटरीने हाती घ्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.


वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंताजनक
रोटे. गनी मेमन यांनी आपल्या भाषणात समाजातील बदलत्या कौटुंबिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि अनेक ठिकाणी वृद्धांसाठी तीन ते पाच वर्षांची प्रतीक्षा यादी लागणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. “मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक जैन आणि रोटरी ॲनी. आरती रेजा यांनी केले. आभार प्रदर्शन नूतन सचिव रोटे. प्रशांत निकम यांनी केले. रोटरी ॲनी. पूर्वा वशिष्ठ यांनी पसायदान सादर केले.
या प्रसंगी मान. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, सौ. ज्योती निकम, धरणगाव, पारोळा व चोपडा येथील रोटरी पदाधिकारी, लायन्स क्लबचे पदाधिकारी, अमळनेर वकील संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, श्री मंगलग्रह मंदिराचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले, खाशी मंडळाच्या माधुरीताई पाटील, नीरज अग्रवाल, मनोहर निकम, ॲड. विलास वाणी, ॲड. मनोहर पवार, ॲड. तिलोत्तमा पाटील, सौ. भारती सोनवणे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी, रोटरी परिवारातील सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती
— रोटे. मकसूद बोहरी यांनी सांगितले.




