करुणा क्लबच्या उपक्रमातून समाजजागृतीची हाक; बापूराव सोनवणे यांच्या अहिराणी गीतांनी रंगला कार्यक्रम
![]()
अहिराणी गीतांतून व्यसनमुक्तीचा जागर; महात्मा फुले हायस्कूलमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी : देवगाव देवळी, ता. अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये करुणा क्लबच्या माध्यमातून व्यसनमुक्ती उद्बोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जवखेडे येथील प्रसिद्ध अहिराणी गायक बापूराव गणपत सोनवणे यांनी आपल्या प्रभावी अहिराणी गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध सामाजिक विषयांबाबत जनजागृती केली.
यावेळी बापूराव सोनवणे यांनी व्यसनमुक्ती, हागणदारीमुक्त गाव, ‘झाडे लावा-झाडे जगवा’, हुंडाबळी तसेच शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर आधारित आशयपूर्ण अहिराणी गीते सादर केली. आपल्या ओघवत्या शैलीतील गायनातून त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देतानाच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, मुलींचे शिक्षण आणि सामाजिक कुप्रथांविरोधात जागरूक राहण्याचे आवाहन केले.
अहिराणी भाषेतील गाणी, विनोदी शैली आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख मिलाफ असल्याने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधन करणाऱ्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. सांस्कृतिक विभागप्रमुख आय. आर. महाजन यांनी अहिराणी गायक बापूराव सोनवणे यांचा परिचय करून देत त्यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी बापूराव सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक करतांना सांगितले की, गेल्या वीस वर्षांपासून बापूराव सोनवणे अमळनेर तालुक्यात अहिराणी गीतांच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांच्या गीतांमधून सामाजिक संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन होण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण होते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळते.
कार्यक्रमास विद्यार्थी तसेच शिक्षक एस. के. महाजन, एच. ओ. माळी, शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक संदेश देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.


