मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत , पुराच्या तडाख्यात वाहून गेलेली जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपरिषद प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश
1 min read

मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत , पुराच्या तडाख्यात वाहून गेलेली जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपरिषद प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश

Loading

मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत

पुराच्या तडाख्यात वाहून गेलेली जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्त; नगरपरिषद प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश

अमळनेर प्रतिनिधी : ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेलाही मोठा फटका बसला. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात शहराची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने अमळनेर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे शहरवासीयांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.

नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हालचाली करत मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. दिवसरात्र अथक परिश्रम, नियोजनबद्ध कार्यवाही आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करत अखेर जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

हे महत्त्वपूर्ण काम मा. आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

नगरसेवकांचा प्रत्यक्ष सहभाग

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा सभापती कैलासतात्या पाटील, उपाध्यक्ष प्रशांत निकम, पंकज चौधरी, नवीद शेख, श्रीराम चौधरी, अनिल महाजन, दादा पवार, तुळशीराम हटकर, सुरजभाऊ परदेशी, पंकज भोई, दीपक चौघुले, नाना धनगर, मुन्नाभाऊ शर्मा, मोहन सातपुते तसेच अन्य नगरसेवकांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक सहकार्य केले.

पुराच्या परिस्थितीनंतर शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा, यासाठी नगरसेवकांनी दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवत प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केले. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील, विजय विसावे, कमोरोद्दीन शेख यांच्यासह नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रतिकूल परिस्थितीतही काम थांबू न देता आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.

दिवसरात्र सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

नागरिकांचे सहकार्य मोलाचे

दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि पाणीपुरवठा सभापती कैलासतात्या पाटील यांनी शहरवासीयांचे आभार मानले.

नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य केल्यामुळेच दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करता आले, असे त्यांनी सांगितले.

शहरवासीयांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध आहे. भविष्यातही अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सहकार्याने आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने आणि प्रभावीपणे करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

शहरवासीयांना मोठा दिलासा

पुराच्या तडाख्यात मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या संकटावर अखेर मात करण्यात आली आहे. प्रशासन, नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या समन्वयातून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने अमळनेर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला असून शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *