अमळनेरच्या पत्रकारितेचा राष्ट्रीय सन्मान! , ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी डॉ. डिगंबर महाले; सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांकडून उत्स्फूर्त सत्कार
![]()
अमळनेरच्या पत्रकारितेचा राष्ट्रीय सन्मान!
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी डॉ. डिगंबर महाले; सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांकडून उत्स्फूर्त सत्कार
अमळनेर प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच तब्बल ७४ देशांमध्ये कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले यांची निवड झाल्याबद्दल शहरात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या निवडीमुळे अमळनेरच्या पत्रकारिता क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला असून, शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. १९) सायंकाळी विठ्ठलनगरातील अभ्यासिका, प्रा. अशोक पवार यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बन्सीलाल भागवत पाटील होते. प्रारंभी महात्मा फुले गीताचे गायन करण्यात आले. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे अमळनेरसाठी गौरवाचा क्षण
पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. डिगंबर महाले यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याची दखल नसून अमळनेरच्या पत्रकारिता क्षेत्रासाठीही अभिमानाचा क्षण असल्याची भावना यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, वंचित व दुर्बल घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणे तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी बांधिलकी जपणे, या कार्याचा उपस्थितांनी गौरव केला. डॉ. महाले यांच्या राष्ट्रीय पातळीवरील नव्या जबाबदारीमुळे अमळनेरचा आवाज व्यापक स्तरावर पोहोचण्यास निश्चितच बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कार्याचा गौरव
कार्यक्रमात अशोक पाटील, गौतम मोरे, रियाज मौलाना, प्रा. लीलाधर रणजित शिंदे, प्रा. अशोक पवार आणि अजय भामरे यांनी मनोगत व्यक्त करून डॉ. महाले यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत राष्ट्रीय पातळीवरील नव्या जबाबदारीसाठी उपस्थित मान्यवरांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ. डिगंबर महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले. मिळालेली राष्ट्रीय जबाबदारी ही अधिक व्यापक आणि जबाबदार पत्रकारितेसाठी प्रेरणादायी असून, पत्रकारिता क्षेत्रातील प्रश्न व पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अनेक संघटनांचा संयुक्त पुढाकार
या सत्कार सोहळ्याचे आयोजन युवा कल्याण प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, बहुजन समाज पार्टी, मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्र सेवा दल, महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, राष्ट्रीय कला मंच, पुरोगामी क्रांती दल तसेच अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँण्ड पब्लिक लायब्ररी, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त केद्रप्रमुख आण्णासाहेब बन्सीलाल भागवत म्हणाले की डॉक्टर डिगंबर महाले सर यांचे कार्य प्रेरणादायी आहे.. त्यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या


आंतरराष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड होणे ही त्यांच्या कार्याची पावती आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून व मंगळ ग्रह सेवा संस्थांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत आता भविष्यात येणाऱ्या काळामध्ये अमळनेर च नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजेल असे सांगत अमळनेर तालुक्यातील तरुणांना नोकरीसाठी योग्य मार्गदर्शन व भविष्यातील आव्हाने याच्यावर एक मार्गदर्शन केंद्र सुरू व्हावे असे सांगितले
, तर डी. ए. पाटील यांनी बहारदार व उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, हितचिंतक तसेच डॉ. महाले यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. महाले यांचा सन्मान करून त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अमळनेरच्या मातीतून पत्रकारितेचा आवाज आता राष्ट्रीय पातळीवर अधिक बुलंद होणार असल्याची भावना या सत्कार सोहळ्याने अधोरेखित केली.







