जिद्द, कठोर साधना अन् वडिलांची सावली: आईच्या स्मृतीला सुरांची आदरांजली; अनुराग जगदाळे एम.ए. संगीतात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम!*
![]()
*जिद्द, कठोर साधना अन् वडिलांची सावली: आईच्या स्मृतीला सुरांची आदरांजली; अनुराग जगदाळे एम.ए. संगीतात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम!*
धुळे प्रतिनिधी: शास्त्रीय संगीतात यश मिळवायचे असेल, तर केवळ सरावाची औपचारिकता पुरेशी नसते, तर सुरांशी आणि रागांशी मनापासून ‘अनुराग’ जडावा लागतो. हेच सुरांवरचे प्रेम जपून एका जिद्दी तरुणाने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. बालपणीच आईचे छत्र हरपल्यानंतर दुःखाचे भांडवल न करता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगीत विभागातील गुणी विद्यार्थी *अनुराग जगदाळे* याने एम.ए. (संगीत) परीक्षेत तब्बल *८६.४५% गुण* मिळवून संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
*ठळक मुद्दे:*
*मोठी कामगिरी:* एम.ए. संगीत परीक्षेत ८६.४५% गुणांसह विद्यापीठात अव्वल.
*बालपणीचा आघात:* वयाच्या ६ व्या वर्षी हरपले मातृछत्र.
*वडिलांची खंबीर साथ:* वडिलांनी आई अन् वडील दोन्ही बनून दिला भक्कम पाठिंबा.
*स्वाभिमानाची साधना:* कोणतीही सहानुभूती न मागता केवळ कठोर रियाजाच्या जोरावर यश.
*सिनेसृष्टीत पदार्पण:* मराठी चित्रपट ‘जब्राट’मधील ‘तू आणि मी’ या गीताद्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण.
*आई हरपली, पण बापाने धरली मायेची सावली!*
अनुराग अवघा ६ वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. आईचे प्रेम काय असते, हे समजण्याच्या वयातच नियतीने काळजावर दगड ठेवला. मात्र, अशा अत्यंत कठीण प्रसंगात अनुरागच्या वडिलांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून मुलासाठी मातृत्वाची उब धरली.
अनुरागच्या गळ्यात असलेली सुरांची दैवी देणगी ओळखून वडिलांनी आणि संपूर्ण कुटुंबियांनी त्याच्या संगीत शिक्षणाची जबाबदारी शिरावर घेतली. प्रतिकूल व संघर्षमय परिस्थिती असतानाही अनुरागच्या रियाजात कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी बापाने घेतली. १० व्या वर्षापासून हातात तंबोरा धरणाऱ्या अनुरागला त्याच्या वडिलांनी सतत बळ दिले.
*सहानुभूती नको, रियाजावर विश्वास!*
शास्त्रीय संगीतात एम.ए. करणे आणि त्यात अव्वल येणे ही कठीण साधना मानली जाते. संगीतातील कठीण राग शिकणे आणि तासन् तास पहाटे रियाज करणे सोपे नव्हते. मात्र, अनुरागने कोणत्याही सहानुभूतीची अपेक्षा न ठेवता केवळ स्वतःच्या मेहनतीवर लक्ष दिले. संगीताचे शास्त्र आणि कठीण रागांवर मिळवलेल्या प्रभुत्वामुळेच त्याने हे दैदिप्यमान यश संपादन केले.
“वयाच्या ६ व्या वर्षी आई गमावली, पण माझ्या बाबांनी मला कधीही एकटे पडू दिले नाही. त्यांनी आई आणि वडील दोन्ही नाती सांभाळली. आज मी विद्यापीठात पहिला आलोय, याचे संपूर्ण श्रेय माझ्या बाबांचे कष्ट, कुटुंबाची साथ आणि गुरूंचे आशीर्वाद यांना आहे. हे यश मी माझ्या आईच्या प्रेरणेला समर्पित करतो!”
— *अनुराग जगदाळे (विद्यापीठात प्रथम)*
*’युवारंग’ ते मराठी सिनेसृष्टी: यशाचा चढता आलेख*
अनुरागच्या या यशाची पाळेमुळे त्याच्या प्रदीर्घ साधनेत आहेत.
*कला महोत्सवांत डंका:* विद्यापीठस्तरीय ‘युवारंग’ व राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ कलामहोत्सव प्रसंगी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत व सुगम संगीत प्रकारात सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके पटकावली आहेत.
*उच्च शिक्षण:* मुंबई विद्यापीठातून बी.ए. (संगीत) तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून ‘संगीत विशारद’ व ‘संगीत अलंकार’ (प्रथम) या पदव्या त्याने संपादन केल्या आहेत.
*पार्श्वगायनात पदार्पण:* २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या प्रगती कोळगे दिग्दर्शित *’जब्राट’* या मराठी चित्रपटातील *’तू आणि मी’* या प्रेमगीताद्वारे त्याने सुगम गायनातही आपला ठसा उमटवला आहे.


निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व धुळे येथील झेडबी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा हा माजी विद्यार्थी सध्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संगीत शिक्षक म्हणून सेवा बजावत आहे. तो येथीलच इंग्रजीचे शिक्षक प्रा. भगवान जगदाळे यांचा कनिष्ठ सुपुत्र आहे.
*सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव*
परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीच्या आणि स्वाभिमानाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हेच अनुरागने दाखवून दिले आहे. आईच्या स्मृतीला अश्रूंची नव्हे, तर सुरांच्या तेजाची खरीखुरी आदरांजली वाहणाऱ्या या सुपुत्रावर आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, उपकुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विभाग संचालक प्रा. राम भावसार, डॉ. मसु पगारे, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, संस्थाचालक ॲड. शरदचंद्र शाह, संगीतगुरू पं. शंकर वैरागकर, डॉ.कुणाल इंगळे,संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. सागर चक्रनारायण, डॉ. मनोज गुरव यांच्यासह जयहिंद व आदर्श संस्थेच्या संचालक मंडळाने अनुरागचे विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

