*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*
![]()
*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*
नंदुरबार प्रतिनिधी(हिरामण सोनवणे)
*आज दि. २२ जुलै २०२६ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जिल्हा धुळे येथे माजी उपमुख्यमंत्री, सेवा व्रती, विकास प्रेमी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देत विद्यालयातर्फे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर स्व. दादांची प्रतिमा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या धुळे जिल्हाध्यक्षा आदरणीय सौ. संजिवनी मधुकरराव गांगुर्डे (पाटील) यांनी शाळेला भेट म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. काशिनाथ माळी यांच्या हस्ते पाठवली होती. त्याबद्दल त्यांचे संस्था व शाळेमार्फत आभार मानण्यात आले. दि. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ स्व. अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले होते. या अपघातात विमानातील इतर चार व्यक्तींचेही निधन झाले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. राज्य व केंद्र सरकारने शोक व्यक्त केला होता. दादांचा करारी स्वभाव असल्याने त्यांचा अधिकारी वर्गात खूप धाक होता. पहाटे पासूनच कामाचे नियोजन, शिस्त प्रियता, लोकसंग्रह वृत्ती, महाराष्ट्र विकासाचा प्रगत आराखडा सतत डोक्यात ठेवून अर्थमंत्री म्हणून प्रत्येक प्रकल्प, योजनांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न व विरोधकांनाही चांगलीच रोखठोक समज घालण्याची खूबी असल्यामुळे जनमानसात दादांची छबी कोरली गेली होती. अशा लोकाभिमुख नेत्यांचं आपल्यातून अचानक निघून जाणं म्हणजे सत्ताधारी, विरोधी नेते व जनता जनार्दनाच्या मनाला चटका लावणारी बाब आहे. स्व. दादांच्या अशा नानाविध आठवणींना आज उजाळा देण्यात आला! आज त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय श्रीमती मा. सुनेत्रा पवार ताईसाहेब स्व. दादांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी, अवघ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वतः राजकारणात सक्रिय सहभागी आहेत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन उपस्थित होते. मुख्याध्यापक मा.श्री. काशिनाथ माळी यांनी स्व. अजित दादांच्या कार्याचा आढावा घेतला, जेष्ठ शिक्षक श्री. हिरामण सोनवणे, श्री. निकुंभ बी.एस. यांनी मनोगत व्यक्त केले., लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे व बहुसंख्य विद्यार्थी- विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य गीत ” जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ” हे गीत सामुदायिक पद्धतीने गायन केले. त्यावेळी परिसर दणाणून गेला होता. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. व विद्यार्थ्यांना यावेळी चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी फलक लेखन व सुत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन श्री. निकुंभ बी. एस. यांनी केले.

