घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरलामंत्री गिरीष महाजनांचा दिलासा.  तातडीच्या मदतीसाठी १० हजार देण्याची घोषणा,पालकमंत्री व आमदारांसह नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी
1 min read

घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरलामंत्री गिरीष महाजनांचा दिलासा. तातडीच्या मदतीसाठी १० हजार देण्याची घोषणा,पालकमंत्री व आमदारांसह नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी

Loading

“घाबरू नका… शासन तुमच्या पाठीशी!”; पूरग्रस्त अमळनेरलामंत्री गिरीष महाजनांचा दिलासा.

तातडीच्या मदतीसाठी १० हजार देण्याची घोषणा,पालकमंत्री व आमदारांसह नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी

अमळनेर प्रतिनिधी : -बोरी नदीला ३१ जुलै रोजी आलेल्या महापुराचा अमळनेर शहर व तालुक्याला मोठा फटका बसला. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणारी नदीपात्रातील मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सोमवारी अमळनेरचा दौरा करून पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
हेडावे नाका,पारोळा रोड, पैलाड परिसर, मरीमाता चौक व मातंगवाडा येथे मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्या. घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या महिलांनी मंत्री गिरीष महाजन यांना आपल्या अडचणी सांगत तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी केली.यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी नागरिकांना धीर देत, “आमचे सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोणालाही मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासनाची मदत मिळेल,” अशी ग्वाही दिली.

वाहून गेलेल्या जलवाहिनीसाठी डीपीडिसीतुन मदत

आमदारांनी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शहराच्या मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनीची माहिती दिल्यानंतर त्याची पाहणी करत नवीन जलवाहिनी उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी “डीपीडीसीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन अमळनेर शहराचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे सांगितले.
दरम्यान,अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महापुरात चार फोटोग्राफर बांधवांची दुकाने पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने कॅमेरे, संगणक, प्रिंटर व इतर लाखो रुपयांचे साहित्य निकामी झाले असून शासनाकडून विशेष आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

बाजार समिती व्यापाऱ्यांनाही दिला धीर

शेवटी मंत्र्यांचा ताफा कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचला. बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली. बाजार समितीच्या मागील संरक्षण भिंत कोसळल्यानेही मोठे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी व्यापाऱ्यांनाही जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले.

प्रत्येकी दहा हजारांची मिळणार मदत

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गिरीष महाजन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, “पूर्वीच्या निकषानुसार तातडीची मदत पाच हजार रुपये दिली जात होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ती वाढवून दहा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शेती, घरांचे नुकसान, जमीन वाहून जाणे, जनावरे दगावणे आदी सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पात्र प्रत्येक आपत्तीग्रस्ताला शासनाची मदत मिळेल असे सांगितले.”

पिंपळे नाल्यावरील अतिक्रमण धारकांवर तातडीने कारवाई करा

पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देत, “नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्यावर तातडीने कारवाई करा. भविष्यात अशी आपत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती पावले आताच उचलावीत,” असे निर्देश दिले.
या दौऱ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नुकसानग्रस्तांचे पंचनामे तातडीने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून शासनाकडून मदत जलदगतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर,जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जयनिल फाऊंडेशनच्या योगदानाचे कौतुक

पुराच्या दिवशी जयनिल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून अनेकांना मदत केली काहींना पुरातून बाहेर काढले,लायन्स क्लब,रोटरी क्लब,जैन सोशल ग्रुप व पत्रकार संघाच्या मदतीने पीडित भागात अन्न व पाणी पोहोचविले या कार्याची माहिती मंत्र्यांना लोकांकडून मिळाल्यावर त्यांनी जयनिल चे अध्यक्ष गौतम पाटील,सर्व कार्यकर्ते व सामाजिक संस्थांचे कौतुक केले.

पूरग्रस्तांनी घाबरू नये

“पूरग्रस्तांनी घाबरून जाऊ नये. शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणताही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही. पंचनामे तातडीने पूर्ण करून मदत जलदगतीने दिली जाईल.”
गिरीष महाजन (जलसंपदा मंत्री) :

मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा

“महापुरामुळे अमळनेरकरांवर मोठे संकट आले आहे. शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासह पूरग्रस्तांना शासनाची प्रत्येक योजना आणि मदत वेळेत मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.”

अनिल पाटील
आमदार-अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *