स्मार्ट मीटर’चा करंट; दुप्पट-तिप्पट वीज बिलांविरोधात ग्राहक पंचायतचा एल्गार!  महावितरणला निवेदन; ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नयेत, पारदर्शकतेची जोरदार मागणी
1 min read

स्मार्ट मीटर’चा करंट; दुप्पट-तिप्पट वीज बिलांविरोधात ग्राहक पंचायतचा एल्गार! महावितरणला निवेदन; ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नयेत, पारदर्शकतेची जोरदार मागणी

Loading

स्मार्ट मीटर’चा करंट; दुप्पट-तिप्पट वीज बिलांविरोधात ग्राहक पंचायतचा एल्गार!

महावितरणला निवेदन; ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नयेत, पारदर्शकतेची जोरदार मागणी

अमळनेर प्रतिनिधी
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना दुप्पट-तिप्पट वीज बिले येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेरच्या वतीने महावितरण कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात महावितरण वीज कंपनी लिमिटेड, अमळनेर उपविभाग-१ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटरबाबत पारदर्शकता राखण्याची व ग्राहकांवरील सक्ती थांबविण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक वीज बिले येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेबाबत महावितरणने संपूर्ण पारदर्शकता ठेवणे आवश्यक असल्याचे ग्राहक पंचायतने स्पष्ट केले.
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ तसेच वीज कायदा २०२३ नुसार ग्राहकाला योग्य माहिती, पारदर्शक सेवा आणि निवडीचा अधिकार मिळणे अपेक्षित आहे. मात्र स्मार्ट मीटर बसविताना या मूलभूत अधिकारांचे पालन होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी स्मार्ट मीटरची तांत्रिक माहिती सर्वसामान्य भाषेत उपलब्ध करून द्यावी, मीटरमध्ये बिघाडाची शंका असल्यास तो कोणत्या अधिकृत प्रयोगशाळेत तपासला जातो याची माहिती ग्राहकांना द्यावी आणि मीटर अचूक असल्यास त्याचे तांत्रिक पुराव्यांसह स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी ठाम भूमिका अखिल भारतीय ग्राहक पंचायतने घेतली.

यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांनी ग्राहकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात येईल आणि स्मार्ट मीटरबाबत सविस्तर माहिती देऊन सर्व संभ्रमांचे निरसन केले जाईल, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी विजय शुक्ला, मकसूद बोहरी, सुनील वाघ, सतीश देशमुख, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सारजे आणि सुभाष पाटील घोडगावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *