गुरुकृपेचा मंगल सोहळा; संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिभावात
![]()
गुरुकृपेचा मंगल सोहळा; संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिभावात
अमळनेर प्रतिनिधी: भारतीय संस्कृतीत गुरु हे ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचे अखंड दीपस्तंभ मानले जातात. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः” या वचनाप्रमाणे गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अमळनेर येथील जी.एम. सोनार नगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे संत गजानन महाराजांच्या महाआरतीने झाली. त्यानंतर जनता बँकेचे व्यवस्थापक महेश गर्के, उद्योजक व समाजसेवक गोविंद अग्रवाल तसेच विजय मेडिकलचे संचालक प्रकाश पारख यांच्या हस्ते विधिवत अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाला संत गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार, अशोक भावे महाराज, नितीन भावे महाराज, सेवेकरी रघुनाथ पाटील तसेच गजानन परिवारातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मारवाड ते अमळनेर अशी सुमारे १५० ते २०० गजानन भक्तांची पायी वारी मंदिरात दाखल झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “गण गण गणात बोते” या जयघोषात आगमन झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत प्रा. आर. बी. पवार व ज्योतीताई पवार,एल.जे.चौधरी, संजय साळुंखे,भाऊसाहेब,
यांनी पुष्पहार अर्पण करून केले.
महिला भक्तांनी सामूहिक पारायण करून गुरुतत्त्वाविषयीची आपली श्रद्धा व्यक्त केली. सामूहिक पारायणाचे वाचन ज्योतीताई पवार यांनी केले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर नामस्मरण, भजन आणि अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महाप्रसादासाठी गोविंद अग्रवाल, महेश गर्के आणि प्रकाश पारख यांनी उदार दातृत्व दाखवत सहकार्य केले. त्यांच्या दातृत्वातून आयोजित महाप्रसादाचा लाभ गजानन परिवारासह शेकडो भाविकांनी घेतला. या सेवाभावी योगदानाबद्दल सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार आणि महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
याचबरोबर संत गजानन महाराज मंदिरात दर गुरुवारी गोविंद अग्रवाल यांच्या दातृत्वातून चना महाप्रसादाचे नियमित वाटप केले जाते. या उपक्रमाचा लाभ दर आठवड्याला अनेक भाविक श्रद्धेने घेत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंदिरास भेट देत दर्शन घेतले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान प्रा. आर. बी. पवार आणि ज्योतीताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
मारवड ते अमळनेर श्री गजानन महाराज पालखी पायी दिंडी सोहळ्याचे धार येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी झेप मंडपात शशिकांत सखाराम पाटील यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी फराळ व चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहीत पवार, विजय वाणी, विश्वास पाटील,माजी प्राचार्य एल.जे.चौधरी, महेश भाऊसाहेब, संजय साळुंखे,व संत गजानन महाराज सेवा संस्था, गजानन परिवार, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ तसेच सर्व सेवेकरी व भक्तांनी परिश्रम घेतले. श्रद्धा, सेवा, समर्पण आणि गुरुभक्तीचा संदेश देणारा हा सोहळा अमळनेरकरांच्या स्मरणात राहणारा ठरला.








