गुणवंतांच्या यशाचा गौरव, गुरुजनांच्या सेवेला मानाचा मुजरा!,  भालेरावनगर-पाटीलगढीत गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा उत्साहात; शिक्षण, संस्कार, कृतज्ञता आणि सामाजिक एकीचा प्रेरणादायी संगम
1 min read

गुणवंतांच्या यशाचा गौरव, गुरुजनांच्या सेवेला मानाचा मुजरा!, भालेरावनगर-पाटीलगढीत गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा उत्साहात; शिक्षण, संस्कार, कृतज्ञता आणि सामाजिक एकीचा प्रेरणादायी संगम

Loading

गुणवंतांच्या यशाचा गौरव, गुरुजनांच्या सेवेला मानाचा मुजरा!

भालेरावनगर-पाटीलगढीत गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा उत्साहात; शिक्षण, संस्कार, कृतज्ञता आणि सामाजिक एकीचा प्रेरणादायी संगम

अमळनेर प्रतिनिधी
मुंदडा एक्झोटिका, अमळनेर येथे भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींचा गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता शिक्षण, संस्कार, कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि पिढ्यांमधील नाते दृढ करणारा सोहळा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. केंद्रप्रमुख आबासाहेब श्री. गोकुळ पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून दाते बापूसाहेब महेश देशमुख, नगरसेवक गटनेते; ताईसाहेब सौ. निलिमा पाटील, नगरसेविका; तसेच समाजसेवक बापूसाहेब रविंद्र पितांबर पाटील उपस्थित होते.

गणेशवंदनेने मंगलमय सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात श्री. रामकृष्ण पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. इंजिनिअर श्री. उज्वल पाटील यांनी सुमधुर स्वरात गणेशवंदना सादर करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब श्री. रामकृष्ण पाटील यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते मा. ग्रेडेड मुख्याध्यापक दादासाहेब हरिचंद्र शिवराम कढरे यांनी सादर केलेले स्वरचित गुणगान पोवाडा. या पोवाड्यात दाते, गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, पुरस्कारार्थी तसेच पाटीलगढी-भालेरावनगरच्या सामाजिक एकीचे सुंदर शब्दचित्र उभे करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव

परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त बंधू-भगिनी आणि पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या परिसरातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्याच्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

घरातून होणारे कौतुक म्हणजे यशाची अर्धी लढाई’

मनोगत व्यक्त करताना आबासाहेब भटू पाटील, मा. केंद्रप्रमुख, चोरवड आणि बापूसाहेब लक्ष्मण पाटील, उच्चशिक्षित शिक्षक यांनी सत्कार सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“घरातून होणारे कौतुक म्हणजे यशाची अर्धी लढाई जिंकल्यासारखे आहे. घरातून कौतुक झाले की जगही कौतुक करते. आपण केलेला हा सन्मान मन भारावून टाकणारा असून आम्ही आपल्या ऋणात राहू,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

महेश देशमुख : ‘भालेरावनगर-पाटीलगढीच्या एकीचा आम्हाला अभिमान’

दाते बापूसाहेब महेश देशमुख यांनी आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, नागरिकांच्या शुभेच्छांमुळेच आपण मोठ्या अपघातातून सुखरूप बाहेर पडलो. या कारणामुळे कार्यक्रमाला विलंब झाला, असे त्यांनी नमूद केले.
“तुमच्या एकीचा आम्हाला हेवा वाटतो. मी अनेक ठिकाणी भालेरावनगर आणि पाटीलगढीचे उदाहरण देतो. गुणवंतांचा सत्कार अनेक ठिकाणी पाहिला आहे; मात्र कॉलनीच्या माध्यमातून सेवानिवृत्त आणि पुरस्कारार्थींचाही सन्मान होताना पाहणे विशेष आहे,” असे ते म्हणाले.
यापुढेही महेश देशमुख आणि रवि बापू यांच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी तसेच सेवानिवृत्त बंधू-भगिनी आणि विशेष पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र

अध्यक्षीय भाषणात आबासाहेब श्री. गोकुळ पाटील, मा. केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थ्यांपासून सेवानिवृत्त शिक्षकांपर्यंत सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

‘१० वी, १२ वी पास होणे ही शर्यतीची सुरुवात आहे’

गुणवंत विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, “१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण होणे म्हणजे एका शर्यतीत विजय मिळवणे आहे; मात्र ही अंतिम शर्यत नाही. खरी शर्यत आता सुरू झाली आहे. संधी ओळखा आणि ‘मौका पाहून चौका’ मारण्याची तयारी ठेवा.”

“मंजिल उन्हीं को मिलती है,
जिनके सपनों में जान होती है;
पंखों से कुछ नहीं होता,
हौसलों से उड़ान होती है.”

या ओळींच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सेवानिवृत्त शिक्षकांसाठी ‘दुसरी इनिंग’

सेवानिवृत्त गुरुजनांचा गौरव करताना त्यांनी शिक्षकाच्या भूमिकेची तुलना मेणबत्तीशी केली—“शिक्षक स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देतो.”

भटू पाटील सर, संतोष पाटील सर, मिलिंद पाटील सर आणि सदाशिव पवार सर यांसारख्या गुरुजनांनी ३० ते ३५ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत अनेक पिढ्या घडवल्याचे त्यांनी गौरवाने नमूद केले.
सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदान आणि समाजप्रबोधन सुरू ठेवावे, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सहभागी व्हावे, आरोग्याची काळजी घ्यावी आणि कुटुंबाला अधिक वेळ द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
“रिटायरमेंट हा शेवट नाही; ती नव्या सुरुवातीची वेळ आहे. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगलात, आता स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जगण्याची हक्काची वेळ आली आहे,” असा भावनिक संदेश त्यांनी दिला.

पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची क्षमता यांचा समतोल महत्त्वाचा

पालकांनी मुलांच्या आवडी, क्षमता आणि बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन अपेक्षा ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. पालकांना पैसा किंवा ऐश्वर्यापेक्षा मुलांचा आधार, चांगले नाव आणि संस्कारयुक्त वर्तन अधिक महत्त्वाचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

“मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवावी. व्यसनांपासून दूर राहावे, मोबाईलच्या आहारी जाऊ नये आणि चांगली संगत निवडावी,” असा संदेश त्यांनी दिला.

“मातृ-पितृ सेवा हेच खरे तीर्थ,” या संत तुकाराम महाराजांच्या विचाराचा संदर्भ देत त्यांनी पालकसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांसाठी पाच सूत्रांचा यशमंत्र

विद्यार्थ्यांनी क्षमता विकसित करण्यासाठी नियमित अभ्यास, आत्मविकास, सकारात्मक संगत, शिस्त आणि वेळेचा योग्य वापर यांना प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
‘रोज एक तास स्वतःसाठी’ हा Self Growth Hour ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळच्या वेळेत अभ्यासाची सवय, वाचनाला प्राधान्य आणि अनावश्यक मोबाईल वापर टाळण्यावर विशेष भर देण्यात आला.

जो वाचतो तोच वाचतो,” या संदेशातून वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका, असा संदेश देताना थॉमस एडिसन यांच्या उदाहरणाचा दाखला देण्यात आला. अपयशाकडे पराभव म्हणून न पाहता शिकण्याची संधी म्हणून पाहावे, असे सांगण्यात आले.

संगत तशी रंगत’—मित्र निवडताना सावध राहा

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत संगतीचे महत्त्व अधोरेखित करताना “संगत तशी पंगत, संगत तशी रंगत” हा संदेश देण्यात आला.

“न धनवान बन, न बलवान बन; बनना है तो अच्छा इंसान बन,” या विचारातून विद्यार्थ्यांनी प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले.
२४ तासांचे नियोजन करून वेळेचा सदुपयोग करावा. रील्स पाहण्यात तासन्‌तास घालवण्यापेक्षा मैदानावर, पुस्तकांमध्ये आणि स्वतःच्या विकासासाठी वेळ द्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.

आज नको, उद्या करू’—यशाच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा

अभ्यासातील सातत्याचे महत्त्व स्पष्ट करताना “आज नको, उद्या करू” ही वृत्ती विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा अडथळा असल्याचे सांगण्यात आले.
परीक्षा संपल्यानंतर अभ्यासाचा विचार करण्यापेक्षा परीक्षेपूर्वीच नियोजनबद्ध तयारी करणे आवश्यक असल्याचे उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आले. शेतकरी पेरणीच्या वेळी कंजूषी करतो आणि कापणीच्या वेळी त्याचे परिणाम भोगतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी १० वी आणि १२ वीच्या काळात मेहनतीत कोणतीही तडजोड करू नये, असा संदेश देण्यात आला.

 

 

 

 

एका मार्काचे आणि एका मिनिटाचेही महत्त्व

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये प्रत्येक गुण आणि प्रत्येक मिनिट किती महत्त्वाचे ठरते, याकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
“थेंबे थेंबे तळे साचे, मार्के मार्के करिअर घडे,” या विचारातून सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व सांगण्यात आले. रेल्वे, परीक्षा किंवा मुलाखत यामध्ये एका मिनिटाच्या विलंबामुळे संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे आजचा छोटासा आळस उद्याच्या मोठ्या पश्चात्तापाचे कारण ठरू शकतो, असा इशारा देण्यात आला.
क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या “हुकला तो संपला” या कवितेचा संदर्भ देत मिळालेली संधी वेळेत साधण्याचे आवाहन करण्यात आले.

सोळा वर्षे तन-मन लावून मेहनत करा’

विद्यार्थ्यांनी तरुण वयातील महत्त्वाचा काळ अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी समर्पित करावा. “आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत,” हा संदेश देत शिक्षणासोबत संस्कारही आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले.
“शिक्षण महाग आहे असे म्हणण्यापेक्षा इतका अभ्यास करा की शासनानेच तुमचे शिक्षण फुकट करावे. गुणवत्तेच्या यादीत स्थान मिळवा, टॉपर व्हा आणि आई-वडिलांच्या कष्टाचा पैसा वाया जाऊ देऊ नका,” असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
बापूसाहेब लक्ष्मण पाटील यांनी शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे आपल्या कार्यातून सिद्ध केल्याचेही नमूद करण्यात आले.

गंगाधर अहिरराव यांचा वैयक्तिक सन्मान

कार्यक्रमात कॉलनीतील गंगाधर अहिरराव दादा यांनी सेवानिवृत्त बंधू-भगिनींचा स्वखर्चाने फुलमाळा, शाल व श्रीफळ देऊन वैयक्तिक सत्कार केला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

ही कॉलनी नाही, हा एक परिवार आहे!’

भालेरावनगर आणि पाटीलगढीतील नागरिकांच्या एकजुटीचे दर्शन या सोहळ्यात घडले. ज्येष्ठ नागरिक, अनुभवसंपन्न बंधू-भगिनी, तरुण विद्यार्थी, महिला आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंतांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन, गुरुजनांच्या सेवेला कृतज्ञ अभिवादन आणि नव्या पिढीला संस्कार व यशाचा मार्ग दाखवणारा हा सोहळा भालेरावनगर-पाटीलगढीच्या सामाजिक ऐक्याचे प्रभावी उदाहरण ठरला.

भालेरावनगर आणि पाटीलगढी ही केवळ वस्ती किंवा कॉलनी नसून परस्परांच्या सुख-दुःखात उभी राहणारा एक परिवार आहे,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *