स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट  , गणेश भामरे यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; शिक्षणाला मिळाला माणुसकीचा हातभार
1 min read

स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट , गणेश भामरे यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; शिक्षणाला मिळाला माणुसकीचा हातभार

Loading

स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट

गणेश भामरे यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम; शिक्षणाला मिळाला माणुसकीचा हातभार

अमळनेर प्रतिनिधी :
शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी कोणत्याही विद्यार्थ्याच्या स्वप्नांना अडथळा ठरू नयेत, या उदात्त भावनेतून खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. पोलीस पाटील तथा अमळनेर तालुका शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन गणेश भामरे यांच्या दातृत्वातून हा प्रेरणादायी सामाजिक उपक्रम साकार झाला.
कार्यक्रमाची सुरुवात शेतकी संघाचे चेअरमन संभाजी पाटील व गणेश भामरे यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत कार्यक्रमामागील सामाजिक उद्देश आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गणेश भामरे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, लोकहिताच्या निर्णयक्षमतेचा तसेच पाडळसरे धरणासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
अध्यक्षीय समारोपात शिक्षक प्रतिनिधी दिनेश पालवे यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रभावी प्रशासनशैली, दूरदृष्टी, जनसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि विकासासाठीच्या त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

यानंतर गणेश भामरे यांच्या हस्ते २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले. नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास झळकत होता. हा गणवेश केवळ पोशाख नसून त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीला बळ देणारी प्रेरणा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास खांजोडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन अहिरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निखिल पाटील, कृष्णा कोळी, सागर पवार, प्रसाद बुवा, जयश्री पाटील आणि नम्रता दोरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी गणेश भामरे यांनी सांगितले की, “आमचे नेते व मार्गदर्शक माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळते. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट देऊन त्यांच्या कार्याला हीच खरी आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न आहे.”
हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, शिक्षणप्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरला असून उपस्थितांकडून गणेश भामरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *