लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात , मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी
![]()
लोककल्याणासाठीच्या भव्य महारुद्र पूजेला सुरूवात
मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; तीन दिवस भाविकांसाठी मंगलमय पर्वणी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृध्दी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजेला बुधवार, दि. 9 सप्टेंबर रोजी येथील प्रधान आचार्य वेदमूर्ती केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चैतन्यमय, भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरूवात झाली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले यांच्या शुभ हस्ते या विशेष धार्मिक सोहळ्यातील परम पवित्र अनुष्ठान कार्य सुरू झाले. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच सदर तीन दिवसीय भव्य महारुद्र अभिषेक पूजा होत आहे.
महापूजेत प्रारंभी भूतशुद्धी व मंगलाचरण करण्यात आले. त्यानंतर मंदिरातील पंचधातूंच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध आदी मंडलांचे पूजन झाले. सर्व देव-देवतांना महारुद्र पूजेदरम्यान उपस्थितीसह कृपादृष्टीचे आवाहन करण्यात आले. तसेच या महापूजेंतर्गत मानव कल्याण, देशाचे संरक्षणास अनुसरून विशेष संकल्प पूजा करण्यात आली. श्री मंगळग्रह देवांचा 594 आवर्तनांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता विशेष महाआरती झाली यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. अशातऱ्हेने प्रथम दिवसाच्या महापूजेची सांगता झाली.
सारंग पाठक, अथर्व कुलकर्णी, शुभम वैष्णव, यश जोशी, चंद्रकांत जोशी, परशुराम शर्मा, तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, अक्षय जोशी, गणेश जोशी, पवन शर्मा, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी, गौरव मिश्रा, हरिओम शुक्ल, मनजीत मिश्रा, सूरज मिश्रा हे पौरोहित्य करीत आहेत. त्यांना उमेश पाठक, चेतन नाईक, प्रवीण भंडारी सहकार्य करीत आहेत.
या महारुद्र अभिषेक पूजेत श्री मंगळग्रह मंदिरातील स्वयंभू अतिजागृत मूर्तीवर 11 लघुरुद्र (1331 रुद्र आवर्तने) होतील. गुरुवारी उर्वरीत आवर्तने होतील. शुक्रवार, दि. 11 सप्टेंबर रोजी श्री मंगळग्रह देव मंदिरातील स्थापित सर्व देवतांसाठीचे हवन बलिदान व पूर्णाहुती होईल.
शुक्रवारी पूर्णाहुतीत सहभागी व्हा!
भगवान श्री मंगळग्रह देवांची आपल्यावर पूर्ण कृपा व्हावी, सर्वांचे रक्षण व भले व्हावे या मुख्य उद्देशाने श्री मंगळग्रह मंदिरात अलौकिक अशी महापूजा सुरू आहे. हल्ली जगामध्ये अनावृष्टी सुरू आहे. कुठे पाऊसच पडत नाही. तर कुठे अति पाऊस पडून जलप्रलय होत आहे. तर अनेक ठिकाणी भयंकर आगींमध्ये अनेकजण होरपळत आहेत. काही ठिकाणी भूकंप, ज्वालामुखी आणि उल्कापाताने अनेकांना जीव गमवावे लागत आहे. जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आले आहे. अतिरेकी व देशद्रोह्यांमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. हे जे सर्व इतिभय चालले आहे त्यातून आपल्या परमपवित्र मातृभमिचे रक्षण व्हावे तसेच जगाचेही कल्याण व्हावे, यासाठी या ‘महारुद्र स्वाहाकारा’मध्ये श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकर यांची आपण आराधना करीत आहोत. मंगळग्रह सेवा संस्था नेहमी विविध स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवत असते. त्यातीलच हा दि. 9, 10 व 11 सप्टेंबर 2026 असा तीन दिवसीय उपक्रम आहे. शुक्रवार, दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता महारुद्र स्वाहाकाराची पूर्णाहुती आहे. पूर्णाहुतीसाठी सर्वांनी अवश्य यावे. आपण या दिवशी पूर्ण दिवसभर आलात तर उत्तमच. कारण पूर्ण दिवसभर त्या दिवशी हवन कार्यक्रम आहे. भाविकांनी या हवनामध्ये दहा मिनिटे का होईना वेळात वेळ काढून या ठिकाणी सहभागी व्हावे, असे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सर्व भाविकांना कळकळीचे आवाहन आहे.
– श्री. केशव प्रभाकर पुराणिक गुरूजी
(प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती, अमळनेर).

