द्वादशीच्या पावन मुहूर्तावर महात्मा फुले कॉलनीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा घेतला संकल्प , नगरसेवक प्रविण (राजूदादा) फाफोरेकर व नगरसेविका योगिता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
द्वादशीच्या पावन मुहूर्तावर महात्मा फुले कॉलनीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा घेतला संकल्प
नगरसेवक प्रविण (राजूदादा) फाफोरेकर व नगरसेविका योगिता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरातील महात्मा फुले कॉलनीत द्वादशीच्या पावन तिथीचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. द्वादशीच्या दिवशी अंबरीष महाराजांची यात्रा भरत असल्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी नगरसेवक प्रविण गंगाराम पाटील (राजूदादा फाफोरेकर) तसेच नगरसेविका सौ. योगिता पाटील यांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाचे दीर्घकाळ संरक्षण व्हावे, यासाठी सर्व झाडांना संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या असून त्यांच्या नियमित संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली आहे.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना नगरसेवक प्रविण पाटील व नगरसेविका योगिता पाटील यांनी “वृक्षारोपण ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून प्रत्येकाने लावलेल्या वृक्षाचे संगोपन करणे ही सामाजिक जबाबदारी आहे,” असे सांगत कॉलनीतील सर्व बंधू-भगिनींना वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात कॉलनीतील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणाच्या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे संपूर्ण परिसरात सामाजिक ऐक्य व पर्यावरणप्रेमाचे सुंदर दर्शन घडले.
यावेळी आत्माराम चौधरी सर, प्रा. प्रविण कोळी, उपशिक्षक सुरेश महाजन, शांतिलाल सोनवणे, अनिल वानखेडे सर, मीनाताई बोरसे, मानसी सोनटक्के, आशाताई पाटील, कैलास चौधरी, अशोक कदम, समाधान पाटील, शांताराम जाधव, प्रथमेश कुलकर्णी, गोकुळ पाटील, मोहिनी पवार, संगिता चौधरी, प्रीती पाटील, रुपाली पाटील यांच्यासह कॉलनीतील अनेक नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वृक्षारोपण उपक्रमामुळे महात्मा फुले कॉलनीत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली असून, “एक वृक्ष – एक जबाबदारी” हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. वृक्षांचे नियमित संगोपन करून परिसर अधिक हिरवागार व प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

