विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमळनेरात NSUI चा आक्रमक कॅण्डल मार्च; शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात संतप्त एल्गार
![]()
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमळनेरात NSUI चा आक्रमक कॅण्डल मार्च; शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात संतप्त एल्गार
अमळनेर प्रतिनिधी
शिक्षण व्यवस्थेतील वाढता गोंधळ, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय, पारदर्शकतेचा अभाव आणि कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात अमळनेर शहरात NSUI च्या वतीने भव्य कॅण्डल मार्च काढत आक्रमक आंदोलन करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”, “शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करा” आणि “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
हा कॅण्डल मार्च बळीराजा स्मारक येथून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप झाला. आंदोलनात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात मेणबत्त्या आणि न्यायाच्या घोषणा देत सहभागी नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांनी शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनागोंदीवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि भ्रष्टाचारमुक्त शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची जोरदार मागणी केली. हा कॅण्डल मार्च केवळ निषेधापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या व्यापक संघर्षाची नांदी असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.
“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असा ठाम इशारा NSUI पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात माजी आमदार बी. एस. पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ॲड. कौस्तुभ पाटील (NSUI जिल्हाध्यक्ष), धनगर दला पाटील, गोकुळ बोरसे, सुलोचना वाघ, दिनेश पवार, मगन भाऊसाहेब पाटील, कैलास पाटील, गिरीश पाटील, रज्जाक शेख, सईद तेली, मनोहर निकम, प्रा.अशोक पवार,प्रा डॉ लीलाधर पाटील, दर्शना पवार,
प्रताप पाटील, रोहिदास दाजी पाटील, जयेश पाटील, नरेंद्र चव्हाण, सृजन संदानशिव, उमेश संदानशिव, प्रवीण पाटील ,भागवत गुरुजी,ज्ञानेश्वर पाटील,कैलास पाटील, प्रकाश पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत विद्यार्थ्यांना आदरांजली वाहिली तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, अशी सामूहिक प्रार्थना केली.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला हा लढा न्याय मिळेपर्यंत अधिक तीव्र स्वरूपात सुरू राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.


