भक्ती, संस्कृती अन् समाजसेवेचा संगम; ‘छंद विठ्ठलाचा’ने जिंकली पुणेकरांची मने ,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ पुस्तकाचे प्रकाशन; जिव्हाळा फाऊंडेशनच्या शिक्षण उपक्रमाचा गौरव, विठ्ठल अभंगांनी रंगला भक्तिमय सोहळा
![]()
भक्ती, संस्कृती अन् समाजसेवेचा संगम; ‘छंद विठ्ठलाचा’ने जिंकली पुणेकरांची मने
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ पुस्तकाचे प्रकाशन; जिव्हाळा फाऊंडेशनच्या शिक्षण उपक्रमाचा गौरव, विठ्ठल अभंगांनी रंगला भक्तिमय सोहळा
पुणे प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘छंद विठ्ठलाचा’ या भक्तिमय कार्यक्रमात विठ्ठल नामाचा अखंड गजर, समाजसेवेचा संदेश आणि सुरेल अभंगांचा मनोहारी संगम अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडले.
कार्यक्रमात जिव्हाळा फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतमजूर कुटुंबातील होतकरू मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा विशेष गौरव करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देत त्यांना स्वावलंबी बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था सातत्याने करीत आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. समाजपरिवर्तनासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते व्यवसायाने नेत्ररोगतज्ज्ञ असलेले डॉ. अमोघ जोशी. वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनचर्या सांभाळतानाच त्यांनी संगीताची अविरत साधना जोपासली आहे. त्यांनी स्वतः रचलेल्या विविध विठ्ठल अभंगांचे सुमधुर सादरीकरण करून उपस्थितांना भक्तिरसात चिंब भिजविले. त्यांच्या गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याच प्रसंगी डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भक्ती, साहित्य आणि संगीत यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या पुस्तकाचे उपस्थितांनी स्वागत केले. डॉ. अमोघ जोशी यांनी रचलेल्या अभंगांमधून विठ्ठलभक्तीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
या कार्यक्रमात स्वप्निल जोशी (निरुपण), श्रीपाद शिरवळकर (तबला), प्रणय सपकाळ (पखवाज), ऋतुराज धुपकर (संवादिनी), प्रबोध जोशी(व्हायोलिन), तुषार दीक्षित(कि-बोर्ड),चैतन्य भालेराव(तालवाद्य) यांची साथसंगत लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती साठे यांनी केले.
यावेळी महापौर मंजुषा नागपुरे,मा. आ. सिद्धार्थ शिरोळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, जिव्हाला फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. शर्वरी मुठे, राजेंद्र मुठे, प्रा. मिलिंद जोशी, प्रा. शारंगधर साठे, डॉ. संगीता पारनेरकर, कार्यक्रमाचे प्रायोजक प्रवीण बढेकर, अमर मांजरेकर, डॉ. अमोघ जोशी, डॉ. आयुषी जोशी, डॉ.अविनाश जोशी,डॉ. सुषमा जोशी, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विठ्ठलभक्त आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आयोजित ‘छंद विठ्ठलाचा’ या कार्यक्रमाने विठ्ठलभक्ती, अभंगसंगीत, समाजसेवा आणि शिक्षण या चारही मूल्यांचा प्रेरणादायी संगम घडवून आणला. भक्ती, संस्कृती आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड घालणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक विचार रुजविणारे ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. भक्तीच्या माध्यमातून समाजसेवेची प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली

