दडी मारली; बळीराजा संकटात!,  अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा – आमदार अनिल पाटील
1 min read

दडी मारली; बळीराजा संकटात!, अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा – आमदार अनिल पाटील

Loading

दडी मारली; बळीराजा संकटात!

अमळनेर मतदारसंघ कोरडा दुष्काळसदृश्य जाहीर करा – आमदार अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी :-अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बँका,पतसंस्था तसेच विविध वित्तीय संस्थांकडून पीक कर्ज घेऊन शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून कर्जाचा वाढता भार आणि उत्पादनाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.या गंभीर परिस्थितीची तातडीने शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी शासनातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली.
यामध्ये ना. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री), ना. दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री) आणि ना. मकरंद पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री) यांना निवेदन देऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांतील सद्यस्थितीची माहिती दिली.

तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी

अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करावेत, तसेच दोन्ही तालुक्यांना कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे.शेतकऱ्यांना आर्थिक मदत, आवश्यक त्या शासकीय सवलती, पीक नुकसानभरपाई आणि इतर योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
“शेतकरी अडचणीत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आपली प्राथमिकता आहे,” या भावनेतून आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला असून, पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, तसेच शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *