परिस्थिती माणसाला घडवते; जिद्द आणि शिक्षणच यशाची खरी गुरुकिल्ली” : प्रा. डॉ. एस. आर. चौधरी  १२ वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला दिले बळ; मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक
1 min read

परिस्थिती माणसाला घडवते; जिद्द आणि शिक्षणच यशाची खरी गुरुकिल्ली” : प्रा. डॉ. एस. आर. चौधरी १२ वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला दिले बळ; मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक

Loading

परिस्थिती माणसाला घडवते; जिद्द आणि शिक्षणच यशाची खरी गुरुकिल्ली” : प्रा. डॉ. एस. आर. चौधरी

१२ वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला दिले बळ; मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील यशपंढरी इंग्लिश क्लासेसतर्फे २०२६ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सायकल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गेल्या बारा वर्षांपासून अत्यल्प शुल्कात ग्रामीण व तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असलेल्या यशपंढरी क्लासेसच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक गणेश पाटील, प्रगती क्लासेसचे संचालक प्रा. संदीप महाजन, प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापक गुलाले सर पत्रकार ईश्वर महाजन, तसेच सक्सेस अकॅडमीचे संचालक पवन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन यशपंढरी क्लासेसचे संचालक प्रा. प्रकाश पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

 

यशपंढरी क्लासेसमध्ये शिक्षण घेऊन यश संपादन केलेल्या भूमिका पाटील ढेकूकर (बारावी – ८५%), भूषण सुनील भोई (दहावी – इंग्रजी विषयात ९२ गुण, अमळनेर तालुक्यात प्रथम), गुंजन धनगर (इयत्ता सहावी – क्लास टॉपर), साहिल कैलास भिल (इयत्ता नववी – क्लास टॉपर) तसेच अश्विनी पाटील (बारावी विज्ञान – ८१%) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सायकल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा झालेला सन्मान उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
प्रास्ताविकात प्रा. प्रकाश पाटील म्हणाले की, “दरवर्षीच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभते. याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. यशपंढरी क्लासेसमध्ये केवळ अभ्यासच नव्हे, तर पालकांशी सातत्याने संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात. येथे पैशापेक्षा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि संस्कारांना अधिक महत्त्व दिले जाते.” त्यांनी वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहितीही दिली.
माजी सैनिक गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कठोर परिश्रम, शिस्त आणि देशप्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याचे सांगत त्यांनी “आई-वडील, शाळा आणि गावाचा सन्मान राखत सातत्याने मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही,” असा संदेश दिला. तसेच २६ जुलै (कारगिल विजय दिवस) या दिवसाचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापक गुलाले सर यांनी जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, असे सांगितले. विज्ञान विषयाविषयी विद्यार्थ्यांमधील भीती दूर करण्यासाठी त्यांनी विविध उदाहरणे दिली. डिजिटल युगात अभ्यासासाठी अनेक साधने उपलब्ध असली तरी त्यांचा योग्य वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार ईश्वर महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “यशपंढरी क्लासेसचे संचालक प्रा. प्रकाश पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल व सन्मानपत्र देऊन केलेला गौरव हा केवळ सत्कार नसून विद्यार्थ्यांच्या कष्ट, जिद्द आणि यशाचा सन्मान आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि तळमळ प्रेरणादायी आहे.”
प्रगती क्लासेसचे संचालक प्रा. संदीप महाजन यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच शिक्षणाविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे मोलाचे कार्य यशपंढरी क्लासेस करत आहेत. आजचा हा सत्कार विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा देणारा ठरेल.” त्यांनी प्रा. प्रकाश पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात माजी प्राचार्य, लेखक व प्राध्यापक डॉ. एस. आर. चौधरी यांनी भावनिक मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “प्रा. प्रकाश पाटील हे माझे विद्यार्थी आहेत. दिव्यांग असले तरी मानसिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि त्यांच्यावर संस्कार करण्याचे मोठे कार्य केले आहे. यशपंढरी क्लासेस ही केवळ शिकवणी नसून संस्कारांचे विद्यापीठ आहे.” त्यांनी स्वतःच्या संघर्षमय जीवनप्रवासाची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत आणि सातत्याचे महत्त्व पटवून दिले. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून ज्ञान मिळवा; मात्र खरे संस्कार शिक्षकच घडवू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित पालक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी यशपंढरी क्लासेसच्या या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले. यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *