सकारात्मक विचार, निस्वार्थ कर्म आणि विज्ञान-अध्यात्माचा समतोल साधा – प्रा. शिवाजीराव पाटील, पूज्य सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत प्रेरणादायी मार्गदर्शन
![]()
सकारात्मक विचार, निस्वार्थ कर्म आणि विज्ञान-अध्यात्माचा समतोल साधा – प्रा. शिवाजीराव पाटील
पूज्य सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत प्रेरणादायी मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी
पुज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी अध्यात्म, विज्ञान, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना प्रा. पाटील म्हणाले की, रामायण आणि महाभारतात युद्धाचे प्रसंग आहेत, मात्र त्यातून सत्य, कर्तव्य आणि धर्माचे पालन करण्याचा संदेश मिळतो. हात कमरेवर ठेवून उभा असलेला विठ्ठल हा कर्म, संयम आणि भक्तीचे प्रतीक असल्याने तो आपल्याला अधिक जवळचा वाटतो, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आणि चैतन्य आहे. प्रत्येक वस्तूचे स्वतंत्र अस्तित्व असल्याचे भौतिकशास्त्र सांगते. दगडाला योग्य दिशा व बाह्यबल मिळाले तर त्यातून सुंदर मूर्ती घडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्येही अमर्याद क्षमता दडलेली असते. “कोण म्हणतं आकाशाला छेद पडत नाही, एकदा दगड उचलून तर पाहा,” या ओळींचा उल्लेख करत त्यांनी प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
सूर्य आणि चंद्र कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अखंड कार्य करत असतात. त्यांच्याकडून निस्वार्थ कर्माची प्रेरणा घ्यावी. स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तरच जीवनाला अर्थ प्राप्त होतो. आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. “जसे कर्म तसे फळ” हा निसर्गाचा आणि जीवनाचा अटळ नियम असल्याचे त्यांनी सांगितले.
चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचा संदर्भ देत त्यांनी विज्ञान, तर्क आणि अध्यात्म यांचा समतोल साधण्याची गरज व्यक्त केली. तसेच समवयस्क मित्रांच्या गाठीभेटींमध्ये इतरांविषयी वाईट बोलणे टाळावे, कोणाच्याही आनंदात विरजण टाकू नये आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस सचिव एस. एम. पाटील, सहसचिव श्रावण पाटील , उपाध्यक्ष उमाकांत नाईक, देविदास जगताप, सुधाकर पवार, गोविंद चित्ते यांच्यासह संघाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी काही सदस्यांनी गीतगायन करून कार्यक्रमात रंगत आणली. प्रा नरेंद्र सोनवणे यांनी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. पाटील यांनी केले.
“


