नितीनच्या स्मृतीतून २९ वर्षांची अखंड शिक्षणसेवा; एका पित्याच्या अश्रूंनी घडविला समाजसेवेचा प्रेरणादायी वारसा
1 min read

नितीनच्या स्मृतीतून २९ वर्षांची अखंड शिक्षणसेवा; एका पित्याच्या अश्रूंनी घडविला समाजसेवेचा प्रेरणादायी वारसा

Loading

नितीनच्या स्मृतीतून २९ वर्षांची अखंड शिक्षणसेवा; एका पित्याच्या अश्रूंनी घडविला समाजसेवेचा प्रेरणादायी वारसा

अमळनेर प्रतिनिधी
काही दुःखांना काळही विसर पाडू शकत नाही. काळ पुढे सरकतो, वर्षे बदलतात, पिढ्या बदलतात; पण लेकराच्या विरहाने विदीर्ण झालेल्या आई-वडिलांच्या हृदयातील वेदना मात्र कधीच संपत नाहीत. अशाच एका पित्याने आपल्या अपत्याच्या आठवणींना अश्रूंमध्ये न जपता समाजसेवेच्या रूपाने अमर केले आहे.
कळमसरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब रमेश चिंधा चौधरी यांचा मुलगा नितीन रमेश चौधरी याचे २२ जुलै १९९७ रोजी अकाली निधन झाले. त्यावेळी नितीन अवघ्या नववीत शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार, चाणाक्ष, शांत स्वभावाचा, शिक्षकांचा लाडका आणि कुटुंबाचा आधारवड बनण्याची स्वप्ने डोळ्यांत साठवलेला हा गुणी विद्यार्थी नियतीने अचानक हिरावून नेला. त्या एका क्षणाने चौधरी कुटुंबाच्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली.
परंतु, मुलाच्या स्मृतींना केवळ अश्रूंमध्ये बंदिस्त न ठेवता त्या समाजोपयोगी कार्यात जिवंत ठेवण्याचा निर्धार आबासाहेब चौधरी यांनी केला. गेल्या २९ वर्षांपासून ते शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे येथील नववीच्या वर्गातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत आहेत. एका मुलाच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना शेकडो विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी देत पूर्णत्वाकडे नेण्याचा हा अनोखा आणि हृदयस्पर्शी प्रयत्न आहे.
यंदाही हा उपक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटताना नितीनच्या आठवणींना उजाळा मिळाला. उपस्थितांच्या मनात त्या कोवळ्या वयात हरपलेल्या विद्यार्थ्याचे चित्र पुन्हा उभे राहिले आणि अनेकांचे डोळे नकळत पाणावले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. पी. महाजन सर यांनी भावना व्यक्त करतांना सांगितले, “एखाद्या अपत्याच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी तब्बल २९ वर्षे समाजसेवेचा दिवा अखंड तेवत ठेवणे ही अतिशय विलक्षण आणि प्रेरणादायी बाब आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ शालेय साहित्य देत नाही, तर माणुसकी, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी शिकवतो.”

अभियंता प्रमोद चौधरी यांनी प्रखर जनसंवादाची बोलतांना सांगितले, “२२ जुलै १९९७ रोजी काळाने माझा लहाण भाऊ अल्पशा आजाराने नितीनला काळाने हिरावून नेले. आज २९ वर्षे उलटली, तरी त्याच्या आठवणी तितक्याच जिवंत आहेत. त्या कायम जिवंत राहाव्यात आणि त्याच्या अपूर्ण स्वप्नांना समाजोपयोगी कार्यातून अर्थ मिळावा, म्हणून दरवर्षी नववीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याची परंपरा आम्ही अखंड सुरू ठेवली आहे.”
कार्यक्रमास शारदा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. पी. महाजन, शिक्षक एस. व्ही. गर्जे, एन. डी. पाटील, दिनेशकुमार टाक, एम. आर. तडवी, कृष्णा तुरे, अभियंता प्रमोद चौधरी तसेच एलआयसी अभिकर्ते संजय चौधरी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
एका मुलाच्या अकाली जाण्याने सुरू झालेला हा प्रवास आज समाजसेवेचा दीपस्तंभ ठरला आहे. नितीन आज या जगात नसला, तरी त्याच्या स्मृतीतून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे आनंदाचे हास्य हेच त्याला वाहिलेले खरे श्रद्धासुमन आहे. अश्रूंना सेवेत रूपांतरित करणाऱ्या या कुटुंबाच्या कार्याला समाजाचा सलाम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *