श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून भव्य महारुद्र पूजा श्रावण समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त तीन दिवसीय विशेष धार्मिक सोहळा
1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून भव्य महारुद्र पूजा श्रावण समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त तीन दिवसीय विशेष धार्मिक सोहळा

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात आजपासून भव्य महारुद्र पूजा
श्रावण समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त तीन दिवसीय विशेष धार्मिक सोहळा

अमळनेर प्रतिनिधी : येथील मंगळग्रह
सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात श्रावण मासाची समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त बुधवार, दि. ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान भव्य महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले यांच्या शुभ हस्ते या विशेष धार्मिक सोहळ्यातील परम पवित्र अनुष्ठान होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत दोन सत्रांत ही पूजा होईल. या भव्य महारुद्र पूजेचे पौरोहित्य प्रधान आचार्य वे. मू. श्री. केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या पूजेच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असल्याने भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेऊन आपला श्रावण सफल करत पुण्यफल मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे. श्री मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी, मंदिरातील ऊर्जा वाढावी व येणाऱ्या काळात वाढलेल्या हिंसाचारावर अंकुश यावा, अशी प्रार्थना करत श्री मंगळग्रह मंदिरातील मुख्य स्वयंभू अतिजागृत मूर्तीवर ११ लघुरुद्र (१३३१ रुद्र आवर्तने) करून मंगळदेवांचा महाभिषेक हा सुमारे दोन दिवस चालणार आहे. तिसऱ्या दिवशी श्री मंगळदेव व मंदिरातील संपूर्ण परिवार देवतांचे हवन करून बलिदान व पूर्णाहुती करून हे कार्य सिद्धीस नेले जाणार आहे.
महारुद्र पूजेची आध्यात्मिक फलश्रुती
धार्मिक श्रद्धेनुसार महारुद्र पूजेच्या माध्यमातून मनःशांती, आरोग्य, सुख-समृद्धी, कुटुंबातील सौख्य आणि जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी श्री मंगळदेवांची कृपा प्राप्त होते, अशी भाविकांमध्ये भावना आहे. संकटसमयी मानसिक बळ मिळावे, नकारात्मक विचार दूर व्हावेत आणि जीवनात सकारात्मकता व सात्त्विक विचारांची वृद्धी व्हावी, या हेतूने अनेक भाविक रुद्राभिषेक व महारुद्र पूजेचे अनुष्ठान करतात. श्री मंगळदेवांच्या कृपाशीर्वादाची फलश्रुती केवळ भौतिक इच्छांच्या पूर्ततेपुरती मर्यादित नसून आत्मशुद्धी, मनाची एकाग्रता, अहंकाराचा क्षय आणि ईश्वराशी असलेले नाते अधिक दृढ होणे हा तिचा व्यापक आध्यात्मिक अर्थ मानला जातो. त्यामुळे महारुद्र पूजा ही भक्ती, श्रद्धा आणि आत्मचिंतन यांचा सुंदर संगम ठरते. श्री मंगळदेव हे शिवपुत्र असल्याने ही महारुद्र पूजा अधिकच फलदायी ठरते.

तीन दिवस भाविकासाठी विशेष सुवर्ण पर्वणी

महारुद्र पूजेदरम्यान तीन दिवसांत ११ लघुरुद्र अभिषेक
पूजन तसेच १ लघुरुद्र हवन विधीवत होणार आहे. तसेच विविध धार्मिक विधी, मंत्रपठण व अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळदेवभक्तांनी या आध्यात्मिक पर्वात सहभागी होऊन भगवान श्री मंगळदेवांचे दर्शन व पूजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे. ‘हर हर महादेव’, ‘मंगलदानी की जय हो’, ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात तीन दिवस चालणाऱ्या या महारुद्र पूजेमुळे श्री मंगळग्रह मंदिर परिसर मंगलभक्तीच्या चैतन्याने भारावून जाणार असून, श्रद्धा आणि अध्यात्माचा हा मंगल धार्मिक सोहळा भाविकांसाठी विशेष सुवर्ण पर्वणी ठरणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *