शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात तब्बल 20 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ; इंदिरा भवनात नागरिकांची विक्रमी गर्दी , अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच निकाली; प्रमाणपत्रे, धनादेश, मंजुरीपत्रे व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती
![]()
शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात तब्बल 20 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ; इंदिरा भवनात नागरिकांची विक्रमी गर्दी
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच निकाली; प्रमाणपत्रे, धनादेश, मंजुरीपत्रे व योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती
अमळनेर प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शनिवार (दि. २५ जुलै) रोजी इंदिरा भवन, अमळनेर येथे भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले. या शिबिरात विविध शासकीय विभागांनी एकाच छताखाली सेवा उपलब्ध करून देत नागरिकांच्या तक्रारी, अर्ज व प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही केली.
कार्यक्रमाला मा. आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी नागरिकांना विविध योजनांची मंजुरीपत्रे, प्रमाणपत्रे, धनादेश व लाभांचे प्रत्यक्ष वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, नायब तहसीलदार प्रशांत धमके यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक विभागाने स्वतंत्र स्टॉल उभारून महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरण, पोलीस, ग्रामीण रुग्णालय, पुरवठा, परिवहन, वन, पर्यावरण आदी विभागांच्या योजनांची माहिती देत नागरिकांच्या समस्या जागेवर सोडविल्या. शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध योजनांचा लाभ मिळविला.
उपलब्ध आकडेवारीनुसार, शिबिरात २० हजार ६८० प्रकरणांवर कार्यवाही, २० हजार ९२९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, तर २ हजार ४९६ नागरिकांची प्रत्यक्ष उपस्थिती नोंदविण्यात आली. महसूल विभागामार्फत विविध दाखले, ७/१२ उतारे, मंजुरीपत्रे, कृषी व महिला कल्याण योजनांचे लाभ, प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान, शैक्षणिक साहित्य वाटप, जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा, स्मार्ट स्कीम, सौर कृषी पंप, ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, रेशनकार्ड सेवा, कुक्कुटपालन, पर्यावरण व वन विभागाच्या योजना अशा विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील व खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त
सौ वसुंधराताई लांडगे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले.
समारोपावेळी तहसीलदार उल्हास देवरे यांनी उपस्थित नागरिक, अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींचे आभार मानले. शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हे शिबिर यशस्वी ठरविले.

