मांडळ-मुडी फड बंधाऱ्यांना पांझरेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा! , डॉ. दिपक पाटील यांच्या मागणीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सकारात्मक प्रतिसाद; नवीन सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
1 min read

मांडळ-मुडी फड बंधाऱ्यांना पांझरेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा! , डॉ. दिपक पाटील यांच्या मागणीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सकारात्मक प्रतिसाद; नवीन सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

Loading

मांडळ-मुडी फड बंधाऱ्यांना पांझरेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा!

डॉ. दिपक पाटील यांच्या मागणीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सकारात्मक प्रतिसाद; नवीन सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

अमळनेर प्रतिनिधी : मांडळ व मुडी परिसरातील शेतकऱ्यांच्या गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फड बंधाऱ्यांना पाणी मिळावे, तसेच भाल्या नाल्यांमध्ये पांझरा नदीचे पाणी पोहोचावे, या महत्त्वपूर्ण मागणीला आता सकारात्मक दिशा मिळाली आहे. शेतकरी पुत्र तथा माजी सभापती पंचायत समिती अमळनेर डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांनी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री नाशिक गिरीश महाजन यांची भेट घेऊन या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. यावेळी मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नवीन सर्वेक्षण करून कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

मांडळ व मुडी परिसरातील बंद पडलेल्या फड बंधाऱ्यांमध्ये पाणी साठावे आणि भाल्या नाल्यांमध्ये पांझरा नदीचे पाणी पोहोचावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नाला सन २०१७ मध्ये तत्कालीन आमदार तथा सलग दोन वेळा संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार स्मिता ताई उदय वाघ, स्वर्गीय उदय बापू वाघ तसेच नदीजोड प्रकल्पाचे प्रणेते व्ही. डी. पाटील यांनी पुढाकार दिला.

स्मिता वाघ यांनी सर्वेक्षणासाठी निधी मिळवून घेतला

डॉ. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या कामाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करून घेण्यात आला. विशेष म्हणजे, सर्वेक्षण करणाऱ्या पथकासोबत स्वतः स्मिता वाघ यांनी तब्बल आठ दिवस परिसरात पायी फिरून पाहणी केली. मांडळ फड बंधाऱ्यांमधून पाणी कोणत्या मार्गाने नेता येईल, तसेच मुडी फड बंधाऱ्यांमध्ये पाणी कसे पोहोचवता येईल, याचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला.

यानंतर जलयुक्त शिवार अभियानातून निधी मंजूर करून नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. या कामामुळे पुढील टप्प्यात फड बंधाऱ्यांमध्ये पाणी पोहोचविण्याच्या प्रयत्नांना आधार मिळाला.

२०१९ मध्ये अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान, सन २०१९ मध्ये माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या प्रश्नाचा पुढील पाठपुरावा केला. मांडळ व मुडी ग्रामस्थांसह मुंबई मंत्रालयात जाऊन तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेण्यात आली. या पाठपुराव्यानंतर दोन्ही फड बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

आज या कामाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, आता फड बंधाऱ्यांमध्ये साठणारे पाणी भाल्या नाल्यांमध्ये तसेच मुडी पाटा परिसरात पोहोचविण्यासाठी काही अडचणी निर्माण होत आहेत.

पाईपलाईन हाच कायमस्वरूपी उपाय!

रस्ते, बांध वाहून जाणे आणि शेतीचे नुकसान यांसारख्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चारीच्या खालून पाईपलाईन टाकून पाणी भाल्या नाल्यांमध्ये पोहोचवावे, तसेच मुडी फड बंधाऱ्याचे पाणी मांडळ गावाच्या बाहेरून मुडी पाटा परिसरात पोहोचवावे, अशी मागणी डॉ. दिपक पाटील यांनी केली आहे.

यासाठी नव्याने सर्वेक्षण करून तांत्रिक अंदाजपत्रक तयार करावे, अशी विनंती त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.

गिरीश महाजन यांचा सकारात्मक प्रतिसाद

डॉ. पाटील यांनी मंत्री महाजन यांची सेवासदन बंगल्यावर भेट घेऊन हा प्रश्न मांडला. त्यावर मंत्री महाजन यांनी निवेदनावर स्वाक्षरी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली. तसेच लवकरच भाल्या नाल्यांमध्ये व मुडी फड बंधाऱ्यांमध्ये पाणी पोहोचविण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

पिण्याचे पाणी, शेती आणि पशुपक्ष्यांसाठी मोठा दिलासा

मांडळ-मुडी परिसरातील हा प्रश्न केवळ सिंचनापुरता मर्यादित नसून पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी तसेच पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न याच्याशी जोडलेला आहे. फड बंधाऱ्यांमध्ये पाणी साठल्यास परिसरातील जलसाठ्याला मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
“या कामासाठी कोणतेही पक्षीय राजकारण किंवा मतभेद न करता सर्वांनी सहकार्य केले. त्यामुळे या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवरांचे पांझरा परिसराच्या वतीने अभिनंदन. यापुढेही कामाची पूर्तता होईपर्यंत सर्वांनी पाठपुरावा करावा,” अशी अपेक्षा डॉ. दिपक पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *