व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला भक्तीचा अपूर्व सोहळा; चिमुकल्यांच्या बाल दिंडीने अवघी शाळा झाली विठ्ठलमय!
1 min read

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला भक्तीचा अपूर्व सोहळा; चिमुकल्यांच्या बाल दिंडीने अवघी शाळा झाली विठ्ठलमय!

Loading

व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला भक्तीचा अपूर्व सोहळा; चिमुकल्यांच्या बाल दिंडीने अवघी शाळा झाली विठ्ठलमय!

अमळनेर प्रतिनिधी
दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सण अत्यंत उत्साहात, भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

चंद्रभागेच्या तीरी तो विटेवरी उभा|
पहाता रूप त्याचे लोपली दिनप्रभा|
भक्तीचा हा सोहळा,आनंदाचा हा सोहळा ||”
या निमित्ताने शाळेच्या वतीने भव्य ‘बाल दिंडी सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे संपूर्ण शाळा परिसर टाळ-मृदुंगाच्या नादाने आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
विठ्ठल-रखुमाईच्या रूपात अवतरले बालचमू
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील लहान मुले विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पारंपरिक वेषात नटून आली होती. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली आणि हातात टाळ घेऊन कपाळाला टिळा लावलेले चिमुकले वारकरी हुबेहूब पंढरीच्या वारीचा भास निर्माण करत होते.
*पालखी पूजन आणि रिंगण सोहळा*
शाळेचे चेअरमन मा.श्री.उत्कर्ष पवार, सचिव सौ.अलका पवार आणि उपाध्यक्ष मा.श्री.उमाकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीचे आणि पालखीचे मनोभावे पूजन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा सोहिते यांनी पालखी खांद्यावर घेऊन दिंडीची सुरुवात केली. शाळेच्या भव्य पटांगणात विद्यार्थ्यांचे ‘रिंगण’ आयोजित करण्यात आले होते. “ज्ञानबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या जयघोषात विद्यार्थ्यांनी धरलेला फुगडीचा फेर आणि मारलेली पाऊले पाहून उपस्थित सर्व शिक्षक व पालक भारावून गेले.

संस्कृती आणि मूल्यांची रुजवणूक
या प्रसंगी शाळेच्या सचिव सौ. अलका पवार यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व समजावून सांगितले. संतांनी दिलेली समता, बंधुभाव आणि भूतदया ही मूल्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावीत, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले. तसेच, विद्यार्थ्यांनी संतांचे लोकप्रिय अभंग आणि भक्तीगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सांगता विठ्ठलाच्या आरतीने झाली. शाळेच्या सचिव सौ. अलका पवार आणि मुख्याध्यापिका सौ. वर्षा सोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक मनीषा सोनार, नीतू शेलकर,चारूलता तायडे,संगीता पाटील, कविता पाटील, प्रद्युमन पवार,महेंद्र पाटील, दीपाली बोरकर, दिव्या पाटील, प्रियंका साळुंके, प्रज्ञा नेतकर, ईशा संगेले तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील आणि विद्यार्थ्यांनी अतोनात परिश्रम घेतले. संपूर्ण परिसरातून या सुंदर उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *