विठ्ठलनामाच्या गजरात साने गुरुजी कन्या हायस्कूल दुमदुमले; आषाढी एकादशीनिमित्त भक्तिरसाने न्हाऊन निघाली दिंडी!”
1 min read

विठ्ठलनामाच्या गजरात साने गुरुजी कन्या हायस्कूल दुमदुमले; आषाढी एकादशीनिमित्त भक्तिरसाने न्हाऊन निघाली दिंडी!”

Loading

“विठ्ठलनामाच्या गजरात साने गुरुजी कन्या हायस्कूल दुमदुमले; आषाढी एकादशीनिमित्त भक्तिरसाने न्हाऊन निघाली दिंडी!”

अमळनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे औचित्य साधत येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने, अभंग, कीर्तन, नृत्य आणि नामसंकीर्तनाने संपूर्ण शाळा भक्तिरसात रंगून गेली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. संदीप घोरपडे होते. त्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील, उपाध्यक्ष श्री. गुणवंतराव पाटील, संचालक ॲड. अशोक बाविस्कर व श्री. किरण पाटील यांनी पालखीचे पूजन केले. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी तुळशीपूजन करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात केली.
यावेळी प्रत्येक वर्गाने भक्तीभाव जागविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इयत्ता ८ वी अच्या विद्यार्थिनींनी अभंग व नृत्य सादर केले, तर ८ वी बने भक्त पुंडलिकाची कथा आणि नामघोष सादर करून वातावरण भक्तिमय केले. ९ वी अने विठ्ठलनामावरील सादरीकरण, ९ वी बने प्रभावी कीर्तन, १० वी अने ‘जगी जीवनाचे सार’ हे गीत तर १० वी बच्या विद्यार्थिनींनी समूहगीतासह आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची भरभरून दाद मिळवली.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी संतांच्या शिकवणीचे महत्त्व आणि वारीची समृद्ध परंपरा विद्यार्थिनींसमोर उलगडून सांगितली. संचालक ॲड. अशोक बाविस्कर यांनी एकादशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात श्री. संदीप घोरपडे यांनी वारीची ऐतिहासिक परंपरा सांगत, “भक्ती म्हणजे केवळ देवपूजा नसून माणसात देव पाहणे आणि सत्कर्मातून समाजसेवा करणे,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

शेवटी विठ्ठलाची आरती, प्रसाद वाटप आणि नामघोषाने दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ९ वी अ व ९ वी बच्या विद्यार्थिनी, वर्गशिक्षक श्री. आर. एम. देशमुख, सौ. मोनाली वंजारी, श्रीमती धनश्री साळुंखे यांनी केले. प्रसादासाठी शिरा तयार करून देणाऱ्या पालक मातांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. जे. एस. पाटील, श्री. शैलेंद्र साळुंके, श्री. दीपक महाजन, श्री. मुकेश पाटील, सौ. मनीषा वैद्य तसेच शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. एम. देशमुख यांनी केले, तर श्री. दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *