विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांवर गंभीर आक्षेप; चौकशी करून नियुक्त्या रद्द करण्याची मागणी
![]()
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांवर गंभीर आक्षेप; चौकशी करून नियुक्त्या रद्द करण्याची मागणी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) पदावर करण्यात आलेल्या नियुक्त्या शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन करून झाल्याचा आरोप करत संबंधित नियुक्त्यांची तातडीने चौकशी करून त्या रद्द करण्याची मागणी करणखेडे ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी, अमळनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच याबाबत योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या ३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी विशिष्ट अटी, पात्रता आणि निवड निकष निश्चित करण्यात आले आहेत. मात्र अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या नियुक्त्या या निकषांचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या नियमांनुसार एसईओ पदासाठी किमान ३३ टक्के महिला प्रतिनिधित्व अपेक्षित असताना निवड यादीत एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच समाजातील सर्व घटकांना समान संधी देण्याच्या तरतुदीचाही भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय संपूर्ण निवड प्रक्रिया गुप्तपणे आणि पारदर्शकतेचा अभाव ठेवून राबविण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित गावांमध्ये कोणतीही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली नाही किंवा इच्छुक नागरिकांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली नाही. काही नियुक्त व्यक्तींच्या पात्रता व चारित्र्य पडताळणीबाबत प्रशासनाची दिशाभूल झाल्याची शंकाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी तालुक्यातील सर्व गावांतील एसईओ नियुक्त्यांची सखोल चौकशी करून नियमबाह्य नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, तसेच भविष्यात अशा नियुक्त्या पूर्ण पारदर्शकतेने आणि शासन नियमांचे काटेकोर पालन करूनच कराव्यात, अशी मागणी केली आहे. यावेळीनिवेदन देतांना करणखेडे येथील शरद धनगर,गजानन कोळी, गणेश गुरव, विशाल सास्के, देवेंद्र पाटील, प्रमोद पवार,
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जळगाव ग्रामीणचे खासदार, अमळनेरचे आमदार तसेच तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

