आषाढीच्या भक्तिरंगात न्हाले रामेश्वर खुर्द; चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईंच्या दिंडीने जिंकली ग्रामस्थांची मने  ,जागृती अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात दिंडी सोहळा; घराघरांत पालखीचे पूजन, भजन-भारुडाने दुमदुमले गाव
1 min read

आषाढीच्या भक्तिरंगात न्हाले रामेश्वर खुर्द; चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईंच्या दिंडीने जिंकली ग्रामस्थांची मने ,जागृती अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात दिंडी सोहळा; घराघरांत पालखीचे पूजन, भजन-भारुडाने दुमदुमले गाव

Loading

आषाढीच्या भक्तिरंगात न्हाले रामेश्वर खुर्द; चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईंच्या दिंडीने जिंकली ग्रामस्थांची मने

जागृती अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात दिंडी सोहळा; घराघरांत पालखीचे पूजन, भजन-भारुडाने दुमदुमले गाव

अमळनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रामेश्वर खुर्द येथे जागृती अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि गावातील भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य दिंडी सोहळा भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश देत मोठ्या जल्लोषात पार पडला. “एक गाव, एक माळ, एकच ध्यास – विठ्ठल नामाचा गजर” या संकल्पनेतून संपूर्ण गाव विठ्ठलभक्तीत रंगून गेले.
यावेळी अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी विठ्ठल-रखुमाई, वारकरी आणि संतांच्या वेशभूषेत दिंडीत सहभाग घेतला. निरागस बालकांच्या आकर्षक रूपाने ग्रामस्थांसह पालकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान असलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची मिरवणूक गावभर काढण्यात आली.
दिंडी मार्गावरील प्रत्येक घरासमोर माता-भगिनींनी पालखीचे औक्षण करून विठ्ठल-रखुमाईचे पूजन केले. अनेक महिलांनी पालखी खांद्यावर घेऊन काही अंतर दिंडीत सहभागी होत वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा व्यक्त केली. त्यामुळे संपूर्ण गावाला क्षणभर पंढरपूर नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दिंडीदरम्यान भजन, भारुड, लेझीम, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामस्मरणाने वातावरण भक्तिमय झाले. गावातील आया-बहिणी, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने भक्तिरसाची अवीट अनुभूती उपस्थितांना मिळाली.
या सोहळ्यात भजनी मंडळाचे विशेष योगदान लाभले. शांताराम दादा, भिका आप्पा, प्रल्हाद महाराज आणि दंगल महाराज यांच्या भजनांनी कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली. या मान्यवरांना केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील यांनी विशेष निमंत्रित केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका प्रमिला पाटील, मदतनीस सोजर पाटील, मुख्याध्यापिका रत्नप्रभा मॅडम, कुणाल पोतदार, वैशाली मॅडम, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून श्रद्धा, संस्कार, सामाजिक समरसता आणि एकीचा संदेश देणारा हा दिंडी सोहळा अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *