विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर NSUI आक्रमक; आंदोलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात , वस्तीगृह, मेस, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक अडचणींवर काँग्रेस भवनात बैठक; न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार
![]()
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर NSUI आक्रमक; आंदोलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात
वस्तीगृह, मेस, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक अडचणींवर काँग्रेस भवनात बैठक; न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या वतीने जळगाव येथील काँग्रेस भवनात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी वस्तीगृहातील अपुऱ्या सुविधा, मेसच्या निकृष्ट गुणवत्तेबाबतच्या तक्रारी, शिष्यवृत्ती वितरणातील विलंब तसेच इतर शैक्षणिक अडचणींबाबत सविस्तर मांडणी केली.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तातडीने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ निवेदनापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने जनजागृती मोहीम राबविणे, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि आवश्यक असल्यास तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्याची रूपरेषाही निश्चित करण्यात आली.
यावेळी NSUI चे जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संघटना कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने प्रभावी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्याची, वस्तीगृहातील मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची, मेस व्यवस्थापनात सुधारणा करण्याची तसेच पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, अशी मागणी केली. या सर्व मागण्यांचे निवेदन तयार करून संबंधित प्रशासनाकडे लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मूलभूत प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार NSUI च्या या बैठकीत व्यक्त करण्यात आला. आगामी काळात विद्यार्थ्यांच्या व्यापक सहभागातून संघटना आंदोलनाची दिशा निश्चित करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

